अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.)अंमली पदार्थांचे शहरातून समुळ उच्चान करण्यासाठी शहर पोलिसांकडून सद्या 'ऑपरेशन वाईप आऊट' राबवण्यात येत आहे. या मोहीमे अंतर्गत पाच किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या मॅरेथॉनमध्ये पोलिस अधिकारी, अंमलदारांसह सुमारे तीनशे ते साडेतीनशे धावपटू सहभागी झाले होते. शहरातील तरूण पिढीसह जनतेमध्ये अंमली पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश समोर ठेवून ही मॅरेथॉन घेण्यात आली.
शहर पोलिसांच्या कवायत मैदाना मधूनमॅरेथॉनला सुरूवात झाली. त्यानंतर सुमारे सव्वा तासाने त्याच मैदानात पाच किलोमीटरची धाव पूर्ण करून मॅरेथॉनचा समारोप झाला. या वेळी शहरातील सुमारे ३०० ते ३५० युवक, युवती, इतर धावकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या मॅरेथॉनच्या आयोजनामुळे जनतेमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्यादुष्परिणामांबाबत जनजागृती होण्यास मदत झाली. पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या संकल्पनेतून ही मॅरेथॉन आयोजित केली होती. मॅरेथॉनमध्ये पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त श्याम घुगे, पोलिस उपायुक्त रमेश घुमाळ यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे, संजय खताळे व कैलास पुंडकर, ठाणेदार यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला होता. सुरूवातीला पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी सर्व स्पर्धकांचे स्वागत केले. पोलिस बँडच्या वतीने राष्ट्रगीत व राज्यगीताने सांगता करण्यात आली. आगामी काळातसुद्धा पोलिस आयुक्तालयाच्या वतीने जनजागृतीपर उपक्रम राबवून व त्यामध्ये जनतेचा सहभाग घेवून जनजागृती केली जाणार आहे. दुसरीकडे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाकडून तसेच आयुक्तालयातील इतर ठाणेदारांनी शहर व आयुक्तालयाच्या हद्दीतील अंमली पदार्थांच्या समुळ उच्चाटनासाठी पुढाकार घेतला आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी