अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.)।
उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाला. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान जून महिन्यातही प्रकल्पांची जलपातळी कमीच होती. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे तसेच मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील ५६ प्रकल्पातील पाणीसाठा हा (६१४.६८ दलघमी) म्हणजेच ५८.६९ टक्के वाढला आहे. दोन दोन दिवसांआधी तो ५२ टक्क्यांवर होता. आता सहा टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान सर्वात मोठ्या अपर वर्धा धरणाचा जलसाठा ६४ टक्क्यांवर गेला.
गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या संततधार तसेच प्रकल्प क्षेत्रातील पावसामुळे १ मोठा प्रकल्प, ७मध्यम आणि ४८ लघु अशा ५६ प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली. तसेच यातील बरेच प्रकल्प ओव्हरफ्लोही झाले होते. यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढली होती. बाष्पीभवनामुळे या ५६ प्रकल्पांचा जलसाठा कमी होत गेला. त्यातील ४८ लघु प्रकल्पापैकी २७ लघु प्रकल्प कोरडे पडले होते. या प्रकल्पांवर अवलंबून असलेले गावांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. मात्र, मागील महिन्यात झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे जलसाठ्घात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व ५६ प्रकल्पांमध्ये आजघडीला ५८.६९ टक्के जलसाठा आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धा धरणाचा पाणीसाठा हा (३६१.६२ दलघमी) म्हणजेच ६४.१९ टक्के आहे. तसेच सात मध्यम प्रकल्पात (१३२.८७ दलघमी) ५१८६ टक्के जलसाठा आहे. तसेच ४८ प्रकल्पात (१२०, १९ दलघमी) अस्र्थात ५२.९४ टक्के जलसाठा आहे. यातील गर्गा या प्रकल्पांचे दारे उघडी करण्यात आली असून यामधून ४.४३ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे.गतवर्षी पेक्षा यंदा सर्व प्रकल्पात पाणीसाठा कमी
मागील वर्षी आजच्या दिवशी दि.१७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांचा जलसाठा हा ७२.२६ टक्क्यांवर होता. मात्र, यंदा तो ५८ टक्क्यांवरच आहे. यंदा प्रथमच ऑगस्ट महिन्यात कोणत्याही प्रकल्पांची दारे खुले करण्यात आली नाही. मागील वर्षी अप्पर वर्धा धरण ८१.३९ टक्के भरले होते. १५ ऑगस्ट २०२४ रोजी त्याची दारे खुले करण्यात आली होती. यंदा मात्र, एकही दार खुले न झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी