रत्नागिरी, 18 ऑगस्ट, (हिं. स.) : हवामान विभागाने आज (१८ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अॅलर्ट दिला असून, पावसाचा जोर चौथ्या दिवशीही कायम आहे.
आज सकाळी संपलेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७० मिलिमीटर पाऊस पडला. संगमेश्वर तालुक्यात १६३.३३ मिमी, दापोलीत १५४ मिमी, चिपळूणमध्ये १४७.११, मंडणगडमध्ये १२४ मिमी, रत्नागिरीत ११९.५५ मिमी, लांज्यात ११६.६६ मिमी, गुहागरमध्ये ११३ मिमी, तर राजापुरात ९९.६२ मिमी पावसाची नोंद झाली.
आज सकाळी नऊच्या स्थितीनुसार, खेडमधल्या जगबुडी नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगमेश्वरातील शास्त्री आणि राजापुरातील कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर तालुक्यात आरवली ते संगमेश्वर ३३ केव्ही वीजवाहिनी नादुरुस्त झाल्याने काल (दि. १७ ऑगस्ट) रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळित होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी