वॉशिंग्टन, 18 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ब्रुकलिनमधील एका हॉटेलमध्ये रविवारी(दि.१७)अनेक बंदूकधाऱ्यांनी लोकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आणि ८ जण जखमी झाले.
ब्रुकलिन पोलिस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, ब्रुकलिनमधील ‘टेस्ट ऑफ द सिटी लाउंज' या हॉटेल मध्ये गोळीबाराची घटना घडली. ही घटना परस्पर वादातून घडली. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८ जण जखमी झाले. मृतांमध्ये तिघेही पुरुष आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर घटनास्थळावरून ३६ काडतुसे आणि एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने पुरावे गोळा करत आहेत.
गोळीबार करण्यात आलेले 'टेस्ट ऑफ द सिटी लाउंज' हे हॉटेल २०२२ मध्ये उघडण्यात आले होते आणि अमेरिकन आणि कॅरिबियन पाककृती, हुक्का, बार आणि डीजे संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटमध्ये रक्ताचे डाग आणि तुटलेल्या काचा विखुरलेल्या दिसत आहेत. यावर्षी न्यूयॉर्कमध्ये गोळीबाराच्या ४१२ घटनांची नोंद झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode