रत्नागिरी, 5 ऑगस्ट, (हिं. स.) : रत्नागिरी शहरात शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या ई-सिगारेटच्या सेवनावर आळा घालण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १ लाख ७२ हजार ५०० रुपये किमतीच्या ६९ ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. या प्रकरणी जय गगनगिरी जनरल स्टोअर्सचे मालक गोविंद दिनेश गजरा (वय ४१, रा. रत्नागिरी) याला अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील विविध शाळांमध्ये विद्यार्थी ई-सिगारेट बाळगत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळात होत्या. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाला ४ ऑगस्ट २०२५ रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तेली आळी नाका येथील जय गगनगिरी जनरल स्टोअर्स येथे ई-सिगारेटची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दुकानावर छापा टाकून सखोल झडती घेतली. झडतीदरम्यान दुकानात ६९ बंदी असलेल्या ई-सिगारेट आढळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपी दुकानदाराविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विशेष पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, दिपक साळवी, अमोल भोसले, आशीष भालेकर, पंकज पडेलकर, प्रशांत पाटील आणि अमित पालवे यांचा समावेश होता.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शाळा आणि महाविद्यालय परिसरात कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ, बिडी, सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी