अमरावती - वऱ्हा-घोटा परिसरात चोरांचा सुळसुळाट; एकाच रात्रीत तीन चो-या
अमरावती, 5 ऑगस्ट, (हिं.स.) - वऱ्हा आणि घोटा परिसरात एका रात्रीत तीन ठिकाणी झालेल्या धाडसी चोरीच्या घटनांनी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. किराणा दुकान, घर व पानटपरी अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी ५ ऑगस्ट २०२५ रोजी म
वऱ्हा-घोटा परिसरात चोरांचा सुळसुळाट : एकाच रात्रीत तीन जबरी चोरीच्या घटना, नागरिकांत भीतीचं वातावरण


अमरावती, 5 ऑगस्ट, (हिं.स.) - वऱ्हा आणि घोटा परिसरात एका रात्रीत तीन ठिकाणी झालेल्या धाडसी चोरीच्या घटनांनी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. किराणा दुकान, घर व पानटपरी अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी ५ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री चोरट्यांनी घडवलेले प्रकार पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहेत.

पहिली घटना वऱ्हा येथील आहे. येथील रोशन विनोद बद्रे यांच्या किराणा दुकानात रात्री ३ ते ४ दरम्यान चोरट्यांनी सेंध घालून सुमारे ८,००० रुपये रोख आणि १०,००० ते १२,००० रुपयांचा चिल्लर माल चोरून नेला. सकाळी दुकान उघडल्यावर चोरी उघडकीस आली. या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संतापाचा सूर आहे.

दुसरी घटना त्याच गावात, गणेश रामचंद्र रावेकर यांच्या घरी घडली. संपूर्ण कुटुंब बालाजी दर्शनासाठी बाहेर गेले असताना, घरी उपस्थित वृद्ध आई-वडिलांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी घराची साकळी तोडून प्रवेश केला. त्यांनी सोन्याची नथ, सोन्याच्या गठू आणि चांदीच्या तोरड्या असा सुमारे २०,००० ते २५,००० रुपयांचा ऐवज लंपास केला. महिलांमध्ये आणि लहानग्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

तिसरी घटना घोटा गावातील निलेश सुरेश रताळे यांच्या पानटपरीत घडली. येथेही चोरट्यांनी धाडसी प्रवेश करून सुमारे १०,००० रुपये रोख रक्कम व काही किरकोळ वस्तू चोरल्या.

या तीनही घटनांमुळे परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने गस्त वाढवावी आणि चोरट्यांना अटक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या तिन्ही गंभीर घटनांची नोंद कुऱ्हा पोलीस स्टेशन येथे झाली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अनुप वाकडे, पोलीस कॉन्स्टेबल सपना निरगुळे व पोलीस शिपाई अक्षय विरघट हे तपास करत आहेत. तसेच अमरावती गुन्हे शाखेला पाचारण करण्यात आलं आहे.

या घटनांमुळे पोलिसांची कार्यपद्धती, गस्त व्यवस्था आणि चोख बंदोबस्ताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, नागरिक आता अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande