अकोला, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथील मन नदीत आज रोजी तीन जण पोहण्यासाठी गेले असता, पाण्याच्या प्रवाहामध्ये तिघेपैकी एक युवक वाहून गेल्याची घटना उघडकीस आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. करण वानखडे असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.
शनिवार सकाळी पिंपळखुटा येथील तीन युवक पोहण्यासाठी गावातील मननदीत गेले असता, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तिघे वाहून गेले, मात्र त्यापैकी नागेश वानखडे, व गोलू वानखडे यांना जीव वाचवण्यात यश मिळाले, परंतु करण वानखडे हा युवक पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे. पातुर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने नदी नाले तुडुंब वाहत आहे. पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तिघे युवक नदीपात्रात उतरले, तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहू लागले, दोन युवकांनी आपले जीव वाचवण्यासाठी संघर्ष केले आणि त्यांना जीव वाचवण्यास यश मिळाले, मात्र एक युवकाला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर निघतच आले नाही, त्यामुळे ते युवक पाण्यात वाहून गेला आणि बेपत्ता झाला, सदर घटनेची माहिती मिळताच पातुरचे तहसीलदार राहुल वानखेडे व चान्नी ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी आपल्या ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व शोध कार्य पथकाच्या मदतीने नदीपात्रात पाहणी केली असता, वाहून गेलेला युवक दिसून आला नसून, शोध कार्य सुरू आहे. शनिवार रोजीच्या संध्याकाळ पर्यंत वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नव्हता, पातूर तहसीलदार राहुल वानखेडे, ठाणेदार रवींद्र लांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साबळे, वंदेमातरम बचत कार्य पथक व पथक प्रमुख उमेश आटोटे, मंडळ अधिकारी सतीश ढोरे, तलाठी मिलिंद इचे, दीपक नळकांडे आदी घटनास्थळी संध्याकाळपर्यंत हजर होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे