नांदेड, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
यंदाच्या खरिप हंगामात मे ते ऑगस्ट या चारही महिन्यात नांदेड जिल्ह्याला प्रतिकूल निसर्गाचा जबर फटका बसला. जिल्ह्यातील ९३ पैकी ८८ मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांची परिस्थिती होत्याचे नव्हते झाल्यासारखी आहे. रस्ते, पूल, घरे, पशुधनासह शेतीचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता जिल्ह्याला भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
शनिवारी व रविवारी दोन दिवस त्यांनी नांदेड शहर व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नांदेड जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती अतिशय भीषण असल्याचे ते म्हणाले.
नांदेड जिल्ह्यातील ५३ महसुली मंडळांमध्ये किमान ३ किंवा त्याहून अधिक वेळा अतिवृष्टी झाली. सोयाबीन व कपाशी या दोन प्रमुख पिकांसह तूर, मुगाच्या पिकाला अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसला. हळद आणि ऊसाचेही काही प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्याच्या ७.५६ लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी बहुतांश शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
त्यामुळे एनडीआरएफच्या निकषानुसार नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरतील, अशी अपेक्षा असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis