नाशिक, 31 ऑगस्ट (हिं.स.)आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) मंदिरात रविवारी श्रीराधाष्टमी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. वृंदावनासह जगभरात इस्कॉन मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर मोठ्या प्रमाणात साजरा होणारा हा दुसरा उत्सव असतो. या उत्सवास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
उत्सवानिमित्त गर्भगृहात पुष्पमाळांची सुंदर सजावट करण्यात आली व विविध फुलांनी, अभूषणांनी भगवंताचा सुंदर शृंगार करण्यात आला होता. ह्या नयनरम्य दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून मंदिरात गर्दी झाली होती. सकाळपासून मंदिरात विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला मंगल आरतीपासून सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद्भागवत प्रवचन झाले. तसेच दिवसभर कीर्तन, भजनाचे विविध कार्यक्रम देखील झाले.
राधाष्टमी उत्सवानिमित्ताने प्रवचनासाठी इस्कॉनचे वरिष्ठ प्रचारक, विदर्भ क्षेत्र पर्यवेक्षक व इस्कॉन अमरावतीचे अध्यक्ष “श्रीमान अनंत शेष प्रभू” यांची विशेष उपस्थिती लाभली व त्यांच्या सुमधुर वाणीने, प्रवाचनाने उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले. राधाष्टमी महामोहोत्सवानिमित्त शनिवारी व रविवारी श्रीमान अनंत शेष प्रभू यांचे विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, उपाध्यक्ष सहस्त्रशीर्ष प्रभू, विग्रह सेवा प्रमुख गोपालानंद प्रभू, सजावट प्रमुख सार्वभौमकृष्ण प्रभू, सेवा प्रमुख सरस कृष्ण प्रभू, रणधीरकृष्ण प्रभू, मुकुंदरस प्रभू, राजा रणछोड प्रभू, अक्षय एडके, बलरामचंद्र प्रभू, तुलसी सेविका माताजी, पूर्ण शक्ती माताजी, प्रिया गोरे माताजी, सत्यभामा कुमारी माताजी आणि इतर कृष्ण भक्तांनी अथक परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV