रत्नागिरी, 31 ऑगस्ट, (हिं. स.)कलेमध्ये नेहमी आगळे वेगळे प्रयोग करणारे देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी एका तासात आठ सुपार्यांवर अष्टविनायकाची चित्रे साकारली आहेत.
श्री. रहाटे यांनी गणेशोत्सवात गणपती बाप्पाची आराधना व सेवा अभिनव पद्धतीने केली आहे. गणपती बाप्पाचे निस्सीम भक्त आणि विविध कलांचे चाहते असणाऱ्या श्री. रहाटे यांनी गणरायाची स्थान असणाऱ्या छोट्याशा सुपारीवर अष्टविनायकाची मालिका तयार केली आहे. सुपारीवरील या आठ कलाकृतींमध्ये मोरेश्वर (मोरगाव), सिद्धेश्वर (सिद्धटेक), बल्लाळेश्वर (पाली), वरदविनायक (महड), चिंतामणी (थेऊर), गिरीजात्मक(लेण्याद्री), विघ्नेश्वर (ओझर), महागणपती (रांजणगाव) या अष्टविनायकांच्या छबीनचा चित्ररूपी समावेश आहे.
श्री. रहाटे यांनी यापूर्वी छोट्याशा तांदळावर गणरायाचे चित्र साकारले होते. विविध रांगोळी प्रकारातून, चित्रातून, मातीकामातून, विविध साहित्यातील डिझाइनमधून त्यांच्याकडून नियमितपणे गणपती बाप्पांची सेवा होत असते. त्यांच्या नावावर जगातील छोट्या रांगोळीची नोंद जागतिक दर्जाच्या ७ रेकॉर्डमध्ये यापूर्वी झाली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३ सेंमी बाय ३ सेंमी आकाराची रांगोळी २५ मिनिटात काढताना त्यांनी १० ग्रॅम रांगोळीचा वापर केला होता. विलास रहाटे यांच्या यावेळच्या नवीन उपक्रमाचे कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी