अमरावती, 1 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे शनिवारी एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली. बोरगाव मंजू (जि. अकोला) येथील शैलेश गोविंद अंभोरे (वय 30) या युवकाचा पुरातन विहीर पाहताना तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाला.
विहिरीत पाण्याचे मोठे प्रमाण आणि मृतकाला पोहता न येणे हे मृत्यूचे मुख्य कारण ठरले.
शैलेश अंभोरे हे आपली पत्नी व मुलांसह स्टेशनरी साहित्य विक्रीसाठी वलगाव येथे आले होते. सकाळी 8 च्या सुमारास ते वलगावमधील गणेडिवाल दवाखान्याच्या मागील जुन्या विहिरीकडे पाहण्यासाठी गेले होते. मात्र विहीर कडेला उभा असताना अचानक तोल जाऊन ते थेट पाण्यात पडले. काही क्षणातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्थानिकांनी तात्काळ वलगाव पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व बचाव दलाच्या जवानांना बोलावण्यात आले.
जवानांनी विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला व जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. शैलेश अंभोरे हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत करत होते. मात्र एका क्षणाच्या असावधतेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वलगाव गावात हळहळ व्यक्त केली जात असून, ही विहीर अपघातासाठी संवेदनशील ठरत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.पुढील तपास वलगाव पोलीस करत असून, मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत आणि या विहिरीच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. नागरिकांनी संताप व्यक्तकरत प्रश्न विचारले ही विहीर सुरक्षित का नाही? ग्रामपंचायतीने विहिरीच्या कडेला संरक्षक कठडे लावले का नाहीत? आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार?
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी