बीजिंग, 1 सप्टेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) च्या शिखर परिषदेनंतर सोमवारी, 1 सप्टेंबर रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत भारत आणि रशियामधील मैत्री एका नव्या उंचीवर पोहोचली. संयुक्त निवेदनादरम्यान, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना “प्रिय मित्र” म्हणून संबोधले, तर पंतप्रधान मोदींनीही रशियाला “भारताचा कठीण काळातील साथी” असे संबोधले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक कठीण प्रसंगी भारत आणि रशिया एकत्र उभे राहिले आहेत. तसेच त्यांनी हेही नमूद केले की जगाच्या स्थिरतेसाठी दोन्ही देश अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचबरोबर पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रयत्न आवश्यक असल्याचे म्हटले.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “मला नेहमीच वाटते की पुतिन यांच्यासोबतची प्रत्येक भेट लक्षात राहणारी असते. आपल्याला अनेक विषयांवर माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली आहे. आपण सतत संपर्कात राहिलो आहोत. दोन्ही देशांमध्ये नियमितपणे अनेक उच्च-स्तरीय बैठकाही झाल्या आहेत.”
पुढे मोदी म्हणाले कि, “140 कोटी भारतीय यावर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या आपल्या 23व्या शिखर परिषदेची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही गोष्ट आपल्या विशेष भागीदारीची खोली आणि व्यापकतेचं प्रतिबिंब आहे. सर्वात कठीण परिस्थितीतही भारत आणि रशिया खांद्याला खांदा लावून चालले आहेत. आपली घनिष्ठ भागीदारी केवळ आपल्या देशांच्या नागरिकांसाठीच नाही, तर जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठीही आवश्यक आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, आपण युक्रेनमध्ये चालू असलेल्या संघर्षावर सातत्याने चर्चा करत आहोत. शांततेसाठी अलीकडील सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. आम्हाला आशा आहे की सर्व पक्ष सकारात्मक आणि रचनात्मक दृष्टीकोनाने पुढे जातील. संघर्ष जितक्या लवकर संपेल आणि शाश्वत शांतता प्रस्थापित होईल, तितके चांगले. ही संपूर्ण मानवतेची मागणी आहे.”
पुतिन म्हणाले कि, “प्रिय मित्र, 21 डिसेंबर रोजी भारत-रशिया विशेष भागीदारीचे 15 वर्षे पूर्ण होत आहेत. आपण पूर्ण प्रामाणिकपणे सांगू शकतो की आपले संबंध तत्वांवर आधारित आहेत. आपल्यामध्ये खूप बहुआयामी सहकार्य सुरु आहे. आजच्या चर्चेमुळे या नात्यांना अधिक बळकटी मिळाली आहे आणि संबंध पुढे नेण्याची संधी मिळाली आहे.”
ही द्विपक्षीय बैठक भारत-रशिया संबंधांमध्ये अधिक विश्वास, सुसंवाद आणि सहकार्य वाढवणारी ठरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode