अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.)
शहराच्या मध्यवर्ती जयस्तंभ चौकात रविवार, ३१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ‘बजाज खिलौना’ या प्रसिद्ध खेळण्यांच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली. या आगीत लाखोंच्या वस्तू जळून खाक झाल्याची माहिती असून, परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या या दुकानात आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला संपर्क केला. अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या काहीच वेळात घटनास्थळी दाखल झाल्या आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले. सुदैवाने, अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात आली.
तीन मजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ही आग लागली होती. याच ठिकाणी खेळण्यांचा मोठा साठा असल्याने आग झपाट्याने पसरली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुकानाला यापूर्वीही आग लागलेली असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
सध्या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी प्रशासनाकडून तपास सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी