येवला लासलगाव मतदार संघातील ४६ गावात एक भाकर समाजासाठी उपक्रम
४५ हजार भाकरी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना
लासलगाव, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील ४६ गावांमधून जवळपास ४५ हजार भाकरी,चटणी मुंबईच्या दिशेने आठ गाड्यांमधून पाठविण्यात आल्या.विशेष म्हणजे लासलगाव येथील जवळपास २० मुस्लिम महिलांनी २५०० भाकरी यामध्ये बनवत एक प्रकारे मराठा आंदोलकांना अनोखी शिदोरी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मराठा समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या बांधवांसाठी भाकर समाजासाठी हा उपक्रम राबविण्याचे ठरले होते त्याप्रमाणे 46 गावांमधील मराठा बांधवांच्या महिलांनी प्रत्येक घरातून भाकर चपाती चटणी बनवत जवळपास ४५ हजार पेक्षा जास्त भाकरी आणि चपात्या,चटणी ही ८ गाड्यांमधून मुंबईच्या दिशेने शुक्रवारी मुंबईकडे निघालेल्या मराठा बांधवांकडे देत पाठवली आहे.
लासलगाव येथील नाज ए वतन संस्थेच्या फरीदा काजी यांच्या सह मुस्लिम महिलांनी एकत्र येत एकाच ठिकाणी २० महिलांनी जवळपास २५०० भाकरी बनवत आपले योगदान दिले.या मुस्लिम महिलांना मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी २०० किलो बाजरी उपलब्ध करून दिली.या भाकरी बनविण्यासाठी ३०० किलो लाकडी सरपण लागले. जवळपास ८ तास यासाठी महिलांनी वेळ दिला.मुस्लिम महिलांनी मराठा बांधवांसाठी भाकरी पाठवत जातीय सलोखा जपण्याचे अनोखे काम करत एक प्रकारे मराठा आरक्षणाला आगळावेगळा पाठिंबा दर्शवाला आहे.
प्रतिक्रिया
जातीय सलोखा जपण्याचं अनोख उदाहरण-
मराठा आंदोलनाला अनेक स्तरातून चांगला पाठिंबा मिळालेला आहे. लासलगाव परिसरातील ४६ गावातून मोठ्या प्रमाणात चपाती आणि भाकरी आंदोलन स्थळी पाठविण्यात आलेल्या आहे मात्र मुस्लिम महिलांनी पुढाकार घेत जवळपास २५०० भाकरी बनवत जातीय सलोखा जोपासण्याचे काम केला आहे निश्चितच मराठा आंदोलकांसाठी आनंददायी बाब आहे. - जयदत्त होळकर,संचालक,मुंबई बाजार समिती
आंदोलकांसाठी भाकरी बनविणे हे भाग्य-
मुंबई येथील आझाद मैदानात मनोज दादा जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू झालेले आहे त्यांच्यासाठी आमच्या भागातून मोठ्या प्रमाणात भाकरी जाणार असल्याचे कळाल्यावर आम्ही देखील यामध्ये सहभाग घेतला. वीस महिलांनी दिवस-रात्र भाकरी बनवत एक प्रकारे मराठा आंदोलकांना आपला आगळावेगळा पाठिंबा दिला आहे.
फरीदा काजी अध्यक्षानाज ए वतन संस्था,लासलगाव
आकडेवारी
किती गावातून आल्या भाकरी चपात्या- ४६एकूण भाकरींची संख्या- ४५०००मुस्लिम महिलांची संख्या- २०मुस्लिम महिलांनी तयार केलेल्या भाकरी-२५००मुस्लिम महिलांना लागलेली बाजरी- २०० किलो भाकरींसाठी लागलेले लाकडी सरपण- ३०० किलो मुंबईकडे पाठविण्यात आलेले वाहने- ८ गाड्या भाकरी
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV