पालघर, 1 सप्टेंबर (हिं.स.) प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात सोमवार १ सप्टेंबर २०२५ रोजी एक-दोन ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. २ सप्टेंबर रोजी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. ३ सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी (ऑरेंज अलर्ट) जाहीर करण्यात आला आहे. या दिवशी जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याचा अंदाज असून, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, समुद्रकिनारी आणि खोल पाण्याजवळ गर्दी करू नये, तसेच शेती कामकाज करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र – कोसबाड यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL