अकोला, 12 सप्टेंबर, (हिं.स.)।
भारत पाक क्रिकेटच्या सामन्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर केलेल्या टिकेनंतर आता भाजप खासदार तथा विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान क्रिकेट मध्ये नमवून जो आनंद मिळतो तो खरा आनंद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते अकोल्यात एका खटल्यासाठी आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
आशिया क्रिकेट चषकात एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला सवाल केल आहे. तर, आदित्य ठाकरे यांनीही भाजपवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपला रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं अशी टीका करण्यात आली आहे. यावर खासदार विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निकम म्हणाले, आम्ही पाकिस्तान सोबत शत्रुत्व नक्की ठेऊ मात्र त्या खेळण्यात चांगले खेळाडू म्हणून वागू पाकिस्तानच्या कुरापती कधीच विसरू शकत नाही. पाकिस्तानच्या कुरापतीला आपण उत्तर दिलं आहे . लोकांना क्रिकेट आवडतं म्हणून आणि पाकिस्तानला क्रिकेट मधून हरवून जो आनंद मिळतो तो वेगळाच असल्याचं उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. तर खून प्रकरणांतील आरोपी विजय पलांडे यांनी उज्वल निकम यांच्या खासदरकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरही प्रतिक्रिया दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे