वॉशिंग्टन, 12 सप्टेंबर (हिं.स.)। अमेरिकेतील टेक्सासमधील डलास येथे भारतीय वंशाचे ५० वर्षीय नागरिकाची त्यांच्या पत्नी आणि मुलासमोर गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.माहितीमुसार, तुटलेल्या वॉशिंग मशीनवरून झालेल्या वादातून हि हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्र मौली ‘बॉब’ नागमल्लैय्या असं हत्या करण्यात आलेल्या नागरिकाचे नाव आहे. हे प्रकरण बुधवारी(दि.११) डॅलस येथील डाउनटाउन सूट्स मोटेलमध्ये घडले. चंद्रमौलीने त्यांचा सहकारी, योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ याला तुटलेली वॉशिंग मशीन वापरू नका असे सांगितल्यावर हा वाद सुरू झाला. लवकरच हा वाद वाढला आणि मार्टिनेझने चंद्रमौलीवर अनेक वार केले. चंद्रमौली मदतीसाठी ओरडत मोटेलच्या पार्किंगमध्ये पळाले, पण योर्डानिसने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. मोटेलच्या फ्रंट ऑफिसमध्ये असलेल्या चंद्रमौलींची पत्नी आणि मुलगा बाहेर आले आणि त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण योर्डानिसने त्यांना ढकलून दूर नेले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हल्लेखोराने कापलेल्या डोक्यावर दोनदा लाथ मारली आणि नंतर ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याचे दिसून येते.
पोलिसांनी सांगितले की, जवळच असलेल्या डलास अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रक्ताळलेल्या योर्डानीसचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कोबोस-मार्टिनेझकडून रक्ताने माखलेला टी-शर्ट, चाकू, नागमल्लैयाचा फोन आणि एक चावी कार्ड जप्त केले. नंतर चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिली. कोबोस-मार्टिनेझचा हिंसक गुन्हेगारी इतिहास आहे. त्याला कॅलिफोर्नियामध्ये दोषी ठरवण्यात आले होते आणि यापूर्वी फ्लोरिडा आणि ह्युस्टनमध्ये अटक करण्यात आली होती, असे रेकॉर्डवरून दिसून येते.
अमेरिकेतील ह्युस्टनमधील भारतीय महावाणिज्य दूतावासाने या घटनेवर एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. दुतावासाने म्हटलंय, “भारतीय नागरिक चंद्र नागमल्लैय्यांच्या दुःखद मृत्यूवर आम्ही दुःख व्यक्त करतो. टेक्सासमधील त्यांच्या कार्यस्थळी क्रूरपणे हत्या करण्यात आली. आम्ही त्यांच्या कुटुंबाशी संपर्कात आहोत आणि शक्य तितकी मदत करत आहोत. आरोपी सध्या डॅलस पोलिसांच्या ताब्यात आहे. आम्ही या प्रकरणावर बारीक लक्ष ठेऊन आहोत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode