काठमांडू, १२ सप्टेंबर (हिं.स.) : नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांनी देशाच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी शुक्रवारी संध्याकाळी शीतल निवास येथे त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
कार्की यांची नेमणूक संविधानाच्या अनुच्छेद ६१ अंतर्गत करण्यात आली असून, नेपाळच्या इतिहासातील पहिल्यांदाच या तरतुदीचा वापर करून पंतप्रधान नेमले गेले आहेत. याआधी सर्व सरकारे अनुच्छेद ७६ अंतर्गत स्थापन झाली होती. कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत.
या शपथविधीचा निर्णय संसद बरखास्तीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. काठमांडूमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी अंतरिम सरकार स्थापनेवर सहमती दर्शवली. देशात सध्या मोठ्या प्रमाणावर असंतोष आणि निदर्शने सुरू असून, अशा वेळी कार्की यांच्यावर सरकारची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शपथविधी समारंभाला उपराष्ट्रपती रामसहाय यादव, प्रधान न्यायाधीश प्रकाश सिंह रावत, माजी पंतप्रधान डॉ. बाबूराम भट्टराई, सेनाप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल, मुख्य सचिव एकनारायण अर्याल, तसेच काठमांडूचे महापौर बालेन शाह उपस्थित होते. कार्की यांच्या पती दुर्गा सुवेदी हे देखील समारंभास उपस्थित होते.
शपथविधीनंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत येत्या ४ मार्च २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सहा महिन्यांच्या आत राष्ट्रीय निवडणुकांची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.
न्यायालयीन कारकीर्द आणि पार्श्वभूमी
सुशीला कार्की यांनी ११ जुलै २०१६ ते ६ जून २०१७ या कालावधीत नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे निर्णय दिले. त्या त्यांच्या साधेपणा आणि पारदर्शक कार्यशैलीसाठी ओळखल्या जातात.
कार्की यांचा जन्म ७ जून १९५२ रोजी विराटनगर येथे झाला. त्यांनी महेंद्र मोरंग कॉलेज मधून पदवी घेतल्यानंतर बनारस हिंदू विश्वविद्यालय मधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आणि १९७८ मध्ये वकिली सुरू केली.
संघर्ष आणि वैयक्तिक आयुष्य
पंचायती राजविरोधी जनआंदोलनात सहभाग घेतल्यामुळे १९९० मध्ये त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्या बी.पी. कोइराला यांच्या कुटुंबाच्या जवळच्या सहकारी होत्या. त्यांच्या पतीने १९७३ मध्ये रॉयल नेपाळ एअरलाइन्सचे विमान अपहरण करून भारतात नेले होते आणि त्यातून नेपाळ राष्ट्र बँकेची रोकड लुटून ती लोकशाहीसाठीच्या चळवळीत वापरली होती.
भविष्यातील आव्हाने
पंतप्रधान म्हणून कार्की यांच्यासमोर स्वतंत्र आणि पारदर्शक निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान आहे. याशिवाय त्यांना जेनरेशन Z, तंत्रज्ञ, आणि विविध राजकीय गटांतील व्यक्तींच्या सहभागातून मंत्रिमंडळ गठित करणे हीही एक कठीण जबाबदारी आहे.
नेपाळच्या भारत आणि चीनसारख्या दोन शक्तिशाली शेजाऱ्यांशी असलेल्या गुंतागुंतीच्या भूराजकीय संबंधांचे व्यवस्थापन करणेही त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी