नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (हिं.स.) दक्षिण आफ्रिका टी२० लीग संघ डर्बन सुपर जायंट्सने आगामी हंगामासाठी एडन मार्करामची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच्या आधी ही जबाबदारी केशव महाराजकडे होती. त्याच्या नेतृत्वाखाली गेल्या हंगामात संघाची कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्यानंतर फ्रँचायझीने हा मोठा बदल केला आहे.
दक्षिण आफ्रिका टी२० लीगचा पहिला हंगाम २०२३ मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हापासून दक्षिण आफ्रिका टी२० लीगचे तीन हंगाम खेळले गेले आहेत. जिथे मार्करामने दोनदा ट्रॉफी उंचावली आहे. सनरायझर्स ईस्टर्न केप संघात असताना त्याने ही दोन्ही विजेतेपदे पटकावली होती.
गेल्या हंगामात म्हणजेच २०२५ चा चॅम्पियन संघ हा एमआय केपटाऊन होता. अंतिम सामन्यात सनरायझर्स ईस्टर्न केपचा ७६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद पटकावले होते. दक्षिण आफ्रिका टी-२० लीगच्या आगामी हंगामासाठी डर्बन सुपर जायंट्स संघाने मार्करामला १.४ कोटी रँडमध्ये खरेदी केले आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम अंदाजे सात कोटी रुपये आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे