सोलापूर, 13 सप्टेंबर, (हिं.स.)। अंध महिलांच्या पहिल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूरच्या गंगा संभाजी कदम हिची भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. गंगाच्या निवडीमुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला आहे. दरम्यान, कर्नाटकची दीपिका टी. सी. ही भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
सोलापुरातील उद्योजक राजेश दमाणी, भैरुरतन दमाणी अंध शाळेचे सचिव, संतोष भंडारी, मुख्याध्यापक प्रकाश दर्शणाळे यांनी तिचे अभिनंदन केले. येथील जामश्री इलिजीअयम क्रिकेट क्लब दमाणीनगर येथे प्रशिक्षक राजू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गंगा कदम क्रिकेटचा सराव करत आहे.शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या गंगा संभाजी कदम हिला एकूण 8 बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. गंगा हिची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीचीआहे. परिस्थितीशी लढा देऊन गंगा कदम हिने हे यश प्राप्त केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड