नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (हिं.स.) आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना उद्या खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेतील सुरुवात युएईविरुद्ध ९ विकेट्सने विजय मिळवून केली. पाकिस्तानने ओमानाचा 93 धावांनी धुव्वा उडवत आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
आशिया कपस्पर्धेच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तानने आतापर्यंत एकूण १८ सामने खेळले आहेत. यापैकी भारताने १० आणि पाकिस्तानने ६ सामने जिंकले आहेत. गेल्या १० वर्षांत ही स्पर्धा एकतर्फी झाली आहे. पाकिस्तान ७ सामन्यांपैकी फक्त एकदाच भारतार विजय मिळवू शकला आहे.
आशिया कप १९८४ पासून खेळला जात आहे. भारताने ८ आणि पाकिस्तानने दोनदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. पण दोन्ही संघ अंतिम फेरीत कधीही आमने-सामने आलेले नाहीत.
आशिया कप १९८४ मध्ये पहिल्यांदा खेळला गेला होता. तेव्हा केवळ भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका सहभागी झाले होते. भारताने शारजाहमध्ये पाकिस्तानचा ५४ धावांनी पराभव केला आणि नंतर राउंड रॉबिन स्वरूपात विजय मिळवून विजेतेपद मिळवले होते. तेव्हा श्रीलंकेचा संघ उपविजेता होता आणि पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.
१९८४ पासून एकदिवसीय आणि टी२० आशिया कपमध्ये दोन्ही संघांमध्ये १८ सामने खेळले गेले आहेत. भारताने १० जिंकलेत तर पाकिस्तानने ६ सामने जिंकले आहेत. १९९७ आणि २०२३ मध्ये दोन्ही संघांमधील १-१ सामनाही अनिर्णीत राहिला होता.
आशिया कप १४ वेळा एकदिवसीय आणि २ वेळा टी२० स्वरूपात खेळला गेला आहे. या काळात दोघांमध्ये एकदिवसीय स्वरूपात १५ सामने खेळले गेले. भारताने ८ जिंकले आणि पाकिस्तानने ५ जिंकले. या काळात २ सामनेही अनिर्णीत राहिले आहेत.
टी२० आशिया कपमध्ये २०१६ मध्ये मीरपूर मैदानावर दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. त्यानंतर भारताने ५ गडी राखून सामना जिंकला होता. २०२२ मध्ये दुबईमध्ये दोघांमध्ये २ टी२० सामने खेळले गेले. भारताने पहिला सामना जिंकला आणि पाकिस्तानने दुसरा सामना ५ विकेट्सने जिंकला. गेल्या १० वर्षात पाकिस्तानचा भारतावरचा हा एकमेव विजय होता. या काळात भारताने ५ सामने जिंकले आहेत.
भारताचा विराट कोहली आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने फक्त ८ सामन्यात ६८ च्या सरासरीने ४७६ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि १ अर्धशतकाचा सामवेश आहे. २०२३ च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराटने शतकही झळकावले होते. २०१२ मध्ये त्याने १८३ धावांच्या खेळीसह भारताला विजय मिळवून दिला होता.
एकूण सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये विराटनंतर रोहित शर्माने ४७४ धावा केल्या आहेत. पण टी-२० निवृत्तीमुळे दोन्ही क्रिकेटपटू आशिया कप संघाचा भाग नाहीत. सध्याच्या संघात हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्ध टी-२० आशिया कपमध्ये ३३ आणि सूर्यकुमार यादवने ३१ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत, भारताच्या तरुण फलंदाजी संघाला कठीण आव्हानाचा सामना करावा लागू शकतो.
भुवनेश्वर कुमार हा आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने ५ सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. पण तो संघाचा भाग नाही. त्याच्यानंतर फिरकी गोलंदाज कुलदीप आणि हार्दिक पंड्या यांच्या नावावर ८-८ विकेट्स आहेत. दोघेही पाकिस्तानविरुद्ध आशिया कप खेळताना दिसतील. टी-२० आशिया कपमध्ये हार्दिकने ७ आणि अर्शदीप सिंगने पाकिस्तानविरुद्ध ३ विकेट्स घेतल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे