नेप्यिडॉ, 13 सप्टेंबर (हिं.स.)। म्यानमारमधील रखाइन राज्यात दोन शाळांवर भयाण हवाई हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी अराकान आर्मीने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात किमान १९ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. घटना शुक्रवारी मध्यरात्री क्यूक्टाव टाउनशिपमध्ये घडली, जिथे अराकान आर्मी आणि म्यानमार सैन्यामध्ये जोरदार संघर्ष सुरु होता.
अराकान आर्मीच्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यामध्ये दोन खासगी शाळा लक्ष्य करण्यात आल्या. १५ ते २१ वर्ष वयोगटातील विद्यार्थी झोपेत असताना देशातील लष्करी विमानांनी प्रत्येक शाळेवर ५०० पाउंड वजनाचे बॉम्ब टाकले. एएने देशातील लष्करी राजवटीवर हा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. “निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल आम्हाला पीडित कुटुंबीयांप्रमाणेच दु:ख होत आहे,” असे निवेदनात नमूद केले आहे.
या घटनेवर संयुक्त राष्ट्रसंघाची लहान मुलांसाठी काम करणारी संस्था युनिसेफने निषेध व्यक्त केला आहे. युनिसेफने या हल्ल्याला क्रूर आणि अमानवीय असं ठरवत म्हटले की, राखाइनमध्ये वाढणाऱ्या हिंसाचाराचा हा एक धोका दाखवणारा घटक आहे, ज्यामुळे लहान मुलं आणि कुटुंबे अतिशय त्रस्त आहेत.
म्यानमारमधील लष्कराने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तज्ञांच्या मते, हा हवाई हल्ला राखाइन भागात सुरू असलेल्या लष्करी कारवाईचा भाग असून, गेल्या वर्षभरात अराकान आर्मीने मोठ्या प्रमाणात भाग ताब्यात घेतला आहे. २०२१ मध्ये आंग सान सू की यांच्या निवडून दिलेल्या सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यापासून देशभरात सशस्त्र संघर्ष पेटलेला आहे.
सध्या हल्ला झालेल्या क्षेत्रातील इंटरनेट आणि फोन सेवा मर्यादित असल्याने घटनेची माहिती संकलन कठीण झाले आहे. परंतु, मानवी हक्क संघटना आणि जागतिक समुदायाने याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule