अकोला, 13 सप्टेंबर (हिं.स.) : अकोल्यात ईद ए मिलादुन्नबी मिरवणुकीत औरंगजेबाच्या पोस्टरवरून गोंधळ उडाला होता या प्रकरणात आज पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे..
अकोल्यात ईद ए मिलादुन्नबी मिरवणुकीदरम्यान औरंगजेब इब्राहिम गाझीच्या पोस्टरवर आठ ते दहा अनोळखी इसमांनी दुग्धभीषेक केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तर याच मिरवणुकीत काहींनी औरंगजेबाचे पोस्टर फिरवल्याचं समोर आलं आहे.
या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगण्यात येत असून, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आदेशांचे उल्लंघन झाल्याने आणि शांतता व सामाजिक एकोप्याला धोका निर्माण झाल्यामुळे पोलीस कर्मचारी आशिष सुगंधी यांच्या तक्रारीवरून कलम 196, 3(5) बीएनएस , स. क. 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे