जळगाव , 13 सप्टेंबर (हिं.स.) दीपनगर येथील जुन्या महामार्गावर दुचाकीच्या भीषण धडकेत १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात वरणगाव येथील हुजेब राऊत खाटीक (१९) हा तरुण ठार झाला आहे. तो सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. हुजेबच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याच्या अचानक मृत्यूने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढावलं आहे. दरम्यान, हुजेब खाटीक हा नमाज पठन करण्यासाठी रस्त्याने पायी जात होता. दीपनगर २१०च्या गेटजवळील चिकनच्या दुकानासमोर अज्ञात व्यक्तीच्या दुचाकी (एमएच १९ आर ९५२६) ने त्यास जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की हुजेबचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हुजेब खाटीकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ट्रॉमा सेंटर रुग्णालयात हलवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तालुका पोलीस करत आहेत. या अपघातामुळे वरणगावात हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर