अकोला, 13 सप्टेंबर (हिं.स.)।बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने पुन्हा एकदा आपली धाडसी व जिद्दी कामगिरी सिद्ध केली आहे. तब्बल 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर 40 फूट खोल पाण्यातून महागडा मोबाईल बाहेर काढण्यात या पथकाला यश आले.
कौलखेड, अकोला येथील सुप्रसिद्ध फोटोग्राफर उमेश उर्फ पप्पु मोहोड हे आपल्या शेतातील फुलबागेस पाणी देण्यासाठी गेले असताना त्यांचा आयफोन 16 मोबाईल विहिरीत पडला. मोबाईल महागडा असून त्यात महत्त्वपूर्ण दस्तऐवज व डेटा असल्याने तो बाहेर काढणे अत्यावश्यक होते. मोहोड यांनी स्वतः प्रयत्न करूनही अपयश आल्यानंतर पिंजर येथील बचाव पथक प्रमुख जिवरक्षक दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यानंतर दीपक सदाफळे यांनी सहकारी शेखर केवट, अंकुश सदाफळे, निलेश खंडारे, विकास सदांशिव, मयुर सळेदार, ऋषीकेश राखोंडे, सार्थक वानखेडे, हर्षल वानखडे, गणेश लेहनकार, सुरज खंडारे, योगेश कुदळे या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तब्बल 22 तास दिवस-रात्र मोहिम सुरू राहिली. पाचही स्विमर सतत विहिरीच्या तळाशी जाऊन प्रयत्न करत होते; परंतु 40 फूट खोल व तुडुंब भरलेल्या पाण्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. अंडरवॉटर स्कुबा डायव्हर अंकुश सदाफळे यांनी स्कुबा किटच्या सहाय्याने तळाशी उतरून मोबाईल शोधून वर काढला. हा क्षण सर्वांसाठी अत्यंत रोमांचक होता. विशेष म्हणजे – चार दिवस पाण्यात बुडालेला हा आयफोन 16 मोबाईल सुरक्षित व सुरू स्थितीत मिळाला. या यशस्वी मोहिमेनंतर फोटोग्राफर उमेशभाऊ उर्फ पप्पु मोहोड व शिव हेल्थ क्लबचे शिवा मोहोड यांनी दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. संतोष बोरडे, गजानन राऊत सस्तीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या थरारक व आगळ्यावेगळ्या बचाव मोहिमेने परिसरात कौतुकाचा वर्षाव होत असून, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित पथकाची जिद्द, धाडस व समाजसेवेची भावना अधोरेखित झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे