नंदुरबार 13 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यात कुपोषण आणि आरोग्य सेवांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून
स्थानिक आमदार आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत काल जिल्ह्यातील दुर्गम भागात दौरा
करण्यात आला असून जिल्ह्यातील आरोग्य सेवा कुपोषण आणि आदिवासी क्षेत्रातील आरोग्य सेवा टास्क
फोर्सच्या माध्यमातून सुधारणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश
आबिटकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले.
या बैठकीस आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य
कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, प्रकल्प अधिकारी अनय नावंदर
(तळोदा), आरोग्य उपसंचालक (नाशिक विभाग) डॉ. कपील आहेर, प्रकल्प अधिकारी (नंदुरबार) चंद्रकांत
पवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
बैठकीत पुढे बोलतांना मंत्री श्री. आबिटकर म्हणाले जिल्ह्यातील सिकलसेल, कुपोषण आणि आदिवासी
भागातील आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना
करण्यात आली असून या टास्क फोर्सचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आहेत. त्यांच्या
नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी काम केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
संकल्पानुसार, महाराष्ट्राला कुपोषणमुक्त करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कालच्या दौऱ्यात रुग्णवाहिका 108 सेवेबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन, जिल्हाधिकारी यांच्याकडून
अहवाल मागवण्यात आला आहे. या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाईल. तसेच, सध्याच्या जुन्या
रुग्णवाहिका बदलून नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून, ऑक्टोबर किंवा
नोव्हेंबरपर्यंत नवीन रूग्णवाहिका उपलब्ध होतील. दुर्गम भागांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करण्यावर
विशेष लक्ष दिले जाईल, असे त्यांनी बैठकीत सांगितले.
आरोग्य सेवेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला जाणार आहे. या
ग्रुपमध्ये आमदार, मेडिकल ऑफिसर, जिल्हा शल्य चिकत्सिक आणि जिल्हाधिकारी यांचा समावेश असेल.
या माध्यमातून रुग्णालयांमधील स्वच्छता आणि औषधांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाईल. तसेच
रुग्णालयांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात
आले आहेत. औषध खरेदीमध्ये गुणवत्ता राखण्यावरही भर दिला जाईल.
मंत्री श्री. आबिटकर पुढे बोलतांना म्हणाले, रुग्ण दाखल करणे, त्याला डिस्चार्ज देणे याबाबत जबाबदारी
निश्चित करावी. तसेच आरोग्य सेवेच्या हलर्गीमुळे रुग्ण दगावल्यास जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई
करावी. जिल्ह्यात सिकलसेलची समस्या खूप गंभीर असल्याने त्यासाठी गांभीर्यपूर्वक व संवेदनशीलतेने
काम करावे.
आरोग्याच्या प्रत्येक कामावर संबंधित अधिकाऱ्यांने स्वत: योग्य देखरेख करावी, बोगस डॉक्टर्स, भांदूबाबा
यांच्यावर आवश्यक कारवाई करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यात आरोग्य सेवा सुरळीत
राहण्यासाठी रस्ते, आरोग्याच्या सर्व इमारती यांच्या आवश्यक त्या दुरुस्ती कराव्यात. कालच्या दौऱ्यात
आरोग्याबाबत ज्या उणिवा आढळून आल्यात त्या संबंधितांना त्वरीत दूर कराव्यात. आरोग्याबाबत पुढील
15 दिवसांत पुन्हा आढावा घेण्यात येणार असून आरोग्य सेवेबाबत हलगर्जी करणाऱ्यांवर कडक कारवाई
करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर