मुंबई, 13 सप्टेंबर, (हिं.स.)। दक्षिणात्य नवा चित्रपट ‘मिराय’ ने प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात केली आहे. ‘हनुमान’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर मोठं नाव कमावणारा अभिनेता तेजा सज्जा याने या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
१२ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘मिराय’ने पहिल्याच दिवशी ‘हनुमान’च्या ओपनिंग कलेक्शनलाही मागे टाकलं आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या माहितीनुसार, कार्तिक गट्टमनेनी दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी सुमारे १२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. फक्त तेलुगू वर्जनमधून १०.६० कोटी रुपये मिळाले. तर हिंदी वर्जनमधून १.२५ कोटी रुपयांची कमाई झाली. याशिवाय, तामिळ, मल्याळम आणि कन्नड मधूनही प्रत्येकी ५-५ लाख रुपयांची भर पडली. यामुळे ‘मिराय’ने तेजा सज्जाच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग नोंदवली आहे. चित्रपटाला केवळ प्रेक्षकांचाच नाही तर समीक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पीपल मीडिया फॅक्टरीच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाची कथा एका तरुण योद्ध्याभोवती फिरते. त्याला नऊ पवित्र शास्त्रांची रक्षा करायची असते. या शास्त्रांमध्ये माणसांना देवतांमध्ये रूपांतर करण्याची शक्ती दडलेली आहे.
चित्रपट करुणा, नैतिकता, तसेच लालच व द्वेषापासून बचाव अशा मानवी मूल्यांवर प्रकाश टाकतो. दमदार पटकथेसोबतच भव्य VFX हा या चित्रपटाचा मोठा आकर्षणबिंदू आहे.
पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर यशाची घणाघाती सुरुवात करत ‘मिराय’ने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर