मुंबई, 13 सप्टेंबर, (हिं.स.)। एक वेगळी, रोमांचक आणि अंगावर शहारे आणणारी वेब सिरीज ‘अंधार माया’. पहिली मराठी हॉरर ओरिजिनल वेब सिरीज, प्रेक्षकांना आता टीव्हीवर बघायला मिळणार आहे. ‘अंधार माया’ ही एक अंगावर शहारे आणणारी, हृदयाचे ठोके चुकवणारी गोष्ट आहे. कोकणच्या गूढ आणि धुंध वातावरणात घडणारी ही कथा, प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. कथेचा केंद्रबिंदू आहे एक जुना वाडा आणि खातू कुटुंब, जे एका शेवटच्या विधीसाठी गावात परत येतं. पण त्यांच्या स्वागताला उभं असतं एक भयावह आणि विचित्र सत्य.
या वेब सिरीजमध्ये आपल्याला पहायला मिळेल कोकणातल्या एका वाड्यात घडणारी रहस्यकथा, कौटुंबिक नात्यांचं जाळं आणि थरकाप उडवणारा हॉरर अनुभव. यात प्रत्येक खोलीतलं रहस्य आणि प्रत्येक आवाज काहीतरी सांगून जातो, ज्यातून कोणाचीच सुटका शक्य नाही.
‘अंधार माया’ या मराठीतल्या पहिल्या हॉररओरिजिनल वेब सिरीज ची निर्मिती एरिकॉन टेलेफिल्म्स ने केली असून दिग्दर्शन केले आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी. कथानक लिहिलं आहे प्रल्हाद कुडतरकर आणि कपिल भोपटकर यांनी. या सिरीज मध्ये दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि अत्यंत गुणी अभिनेते किशोर कदम यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
हिंडणाऱ्या सावल्या, बंद दरवाज्यांच्या पलीकडचं गूढ आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना ‘अंधार माया’ही सिरीज केवळ एक हॉरर अनुभव नाही, तर ती एक भावनिक, मानसिक आणि सांस्कृतिक प्रवास आहे.
तेव्हा टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच ओटीटी वरून थेट टीव्हीवर ! बघायला विसरू नका ‘अंधार माया’ चा भव्य प्रीमियर १४ सप्टेंबर दुपारी १२ वाजता. सदैव तुमच्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर