इस्लामाबाद, 14 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाकिस्तानचे १९ सैनिक ठार झाले. तर, लष्कराच्या कारवाईत ४५ दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला. मारले गेलेले दहशतवादी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चे सदस्य असल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या माहितीनुसार, 10 ते 13 सप्टेंबरदरम्यान खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तीन वेगवेगळ्या भागांमध्ये चकमकी झाल्या. याच चकमकीत किमान 45 दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवाद्यांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले.
मीडिया रिपोर्टनुसार, “शहबाज शरीफ यांनी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासोबत बन्नूला भेट दिली आणि दहशतवाद नियंत्रणावर केंद्रित एका उच्चस्तरीय बैठकीत भाग घेतला.” त्यांनी स्पष्ट केले की, दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानची मोहीम कोणतीही तडजोड किंवा संदिग्धता न ठेवता पूर्ण ताकदीने सुरू राहील.”
शाहबाज शरीफ यांनी आरोप केला की, पाकिस्तानातील हल्ल्यांसाठी जबाबदार असलेले दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार अफगाणिस्तानातून कारवाया करत आहेत. दहशतवादी घटनांमध्ये घुसखोर अफगाण नागरिकांचा सहभाग असल्याचा दावा करत, त्यांनी पाकिस्तानात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अफगाण नागरिकांना परत पाठवण्याची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले.
पंतप्रधान शरीफ म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा दिशाभूल करणारी विधाने स्वीकारणार नाही. या भेटीदरम्यान, पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी बन्नू येथील लष्करी रुग्णालयात जखमी सैनिकांचीही भेट घेतली.
पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग आयएसपीआरनुसार, बाजौर जिल्ह्यात गुप्तचर यंत्रणांवर आधारित कारवाईत २२ बंडखोर मारले गेले.दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यात १३ दहशतवादी मारले गेले, तर १२ सैनिक ठार झाले. लोअर डेर जिल्ह्यात लाल किल्ला मैदानात झालेल्या दुसऱ्या कारवाईत १० दहशतवादी आणि ७ सैनिक मारले गेले. या कारवायांमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
असं मानलं जातंय की पाकिस्तानने ही कारवाई जगाला दाखवण्यासाठी केली आहे, कारण त्याच्यावर नेहमीच हा आरोप लागतो की तो दहशतवाद्यांना आश्रय देतो. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जेव्हा पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई केली, तेव्हा हे स्पष्ट करण्यात आलं की दहशतवादाबाबत भारताची भूमिका “झिरो टॉलरन्स” ची राहील. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आश्रयाचा मुद्दा मांडला. यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढला आहे आणि आता पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, की तो एक मोठा दहशतवादविरोधी देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode