अकोला शहरात डेंगू,चिकनगुनियाच्या रुग्णांत वाढ
अकोला, 14 सप्टेंबर (हिं.स.)। अकोला शहरात सध्या डेंगू व चिकनगुनियाच्या साथीचा गंभीर प्रादुर्भाव झाला असून, आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. शहरातील जवळपास सर्वच दवाखाने रुग्णांनी गच्च भरले असून, १०० टक्के खाटा व्यापलेल्या आहेत. खाजगी तसेच सरकारी
अकोला शहरात डेंगू,चिकनगुनियाच्या रुग्णांत वाढ


अकोला, 14 सप्टेंबर (हिं.स.)।

अकोला शहरात सध्या डेंगू व चिकनगुनियाच्या साथीचा गंभीर प्रादुर्भाव झाला असून, आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. शहरातील जवळपास सर्वच दवाखाने रुग्णांनी गच्च भरले असून, १०० टक्के खाटा व्यापलेल्या आहेत. खाजगी तसेच सरकारी दवाखाने रुग्णांनी फुल्ल असून, नागरिकांना उपचारासाठी जागा मिळणेही कठीण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून डासांच्या प्रचंड वाढलेल्या उत्पातामुळे आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. पावसाळ्यामुळे साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने डासांच्या प्रजननाला खतपाणी मिळाले आहे. परिणामी शहरातील जवळपास प्रत्येक प्रभागात डेंगू व चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत.

मनपाच्या निष्क्रियतेवर टीका

या परिस्थितीतही अकोला महानगरपालिका यंत्रणा ठोस पावले उचलताना दिसत नाही. शहरातील अनेक भागांत गटारे साफ न झाल्यामुळे व पाणी साचल्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. नागरिकांना जंतुनाशक फवारणी व नियमित स्वच्छता मोहीम न झाल्याची तीव्र खंत आहे.

या गंभीर पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांनी आज पत्रकारांशी बोलताना संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की :

निलेश देव यांची मागणी

सर्व प्रभागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी.

जंतुनाशक व डास प्रतिबंधक फवारणी मोठ्या प्रमाणात केली जावी.

विशेष आरोग्य ड्राईव्ह राबवून ताप असलेल्या नागरिकांची तपासणी करून त्वरित औषधोपचार करण्यात यावेत.

शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांची व्यवस्था करण्यात यावी.

मनपाच्या आरोग्य योजना तातडीने सक्रिय करून मोफत तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत.

नागरिकांमध्ये वाढती भीती

सध्या जवळपास प्रत्येक कुटुंबात एखादा तरी सदस्य तापाने त्रस्त असल्याचे चित्र आहे. खाजगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणावर गर्दी असून खर्च परवडणारा नाही. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवर उपचाराचा प्रचंड आर्थिक भार पडत आहे. काही प्रकरणांत गंभीर रुग्णांना नागपूर, अमरावतीकडे हलवावे लागत आहे.

रोषाचा इशारा

“जर महानगरपालिका व आरोग्य विभागाने तातडीने कठोर उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिकांचा संताप उसळेल. प्रशासनाच्या निष्क्रियतेला जनता जबाबदार धरेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर मनपाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” असा इशारा निलेश देव यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande