लंडन, 14 सप्टेंबर (हिं.स.)। नेपाळ आणि फ्रान्सनंतर ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात मोठे उजव्या विचारसरणीचे निदर्शन दिसून आले. येथील कट्टरपंथी नेता तथा स्थलांतर विरोधी कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली लंडनमध्ये एक लाखांपेक्षा जास्त आंदोलकांनी टॉमी राबिन्सन यांच्या नेतृत्वात रॅली काढली.
ब्रिटनमधील नी शनिवारी (13 सप्टेंबर) आयोजित केलेल्या ‘युनाइट द किंगडम’ मार्चमध्ये एक लाखाहून अधिक लोक सहभागी झाले. मात्र, या रॅलीदरम्यान रॉबिन्सन समर्थकांचा एक गट पोलिस आणि काउंटर-प्रोटेस्टर्स (विरोध करणाऱ्या गट) यांच्याशी भिडला आणि हिंसाचार उसळला. यावेळी पोलिसांवर बाटल्या फेकण्यात आल्या, अनेक पोलिस अधिकाऱ्यांना मुक्के आणि लाथा मारण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच दंगलविरोधी पथक तैनात करावे लागले.
मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत 26 पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी चार गंभीररीत्या जखमी आहेत. काहींची नाक मोडली, काहींचे दात तुटले, तर एका अधिकाऱ्याच्या मणक्याला दुखापत झाली. या हिंसाचारामध्ये सहभागी असलेल्या 25 लोकांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी असिस्टंट कमिशनर मॅट ट्विस्ट म्हणाले, “खूप लोक शांततेच्या हेतूने आले होते, पण मोठ्या संख्येने काही लोक हिंसाचार घडवण्यासाठी आले होते. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न केला.”
या रॅलीत 1 लाख 10 हजार ते 1 लाख 50 हजार लोक सहभागी झाले, तर याच्या विरोधात ‘मार्च अगेंस्ट फॅसिझम’ नावाची रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये सुमारे 5,000 लोक सहभागी झाले. त्या ठिकाणी “शरणार्थ्यांचे स्वागत आहे” आणि “उजव्या विचारसरणीचा अंत करा” असे घोषवाक्ये देण्यात आली.
फ्रान्सचे उजव्या विचारसरणीचे नेते एरिक झेमूर यांनी म्हटले की, युरोपवर मुस्लिम देशांकडून वसाहतीकरण होत आहे. तर एलन मस्क यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे ब्रिटनमधील डाव्या विचारसरणीच्या सरकारवर टीका केली आणि म्हटले की, अनियंत्रित स्थलांतर ब्रिटनला संपवते आहे. रॅलीमध्ये अमेरिकन उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली किर्क यांचीही आठवण करण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले आणि बगपाइपरने “अमेजिंग ग्रेस” धून वाजवली.
रॉबिन्सन हे इंग्लिश डिफेन्स लीगचे संस्थापक आहेत आणि ब्रिटनमधील सर्वात मोठ्या उजव्या विचारसरणीच्या चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या समर्थकांनी “स्टॉप द बोट्स”, “सेन्ड देम होम” आणि “वी वाँट अवर कंट्री बॅक” अशा घोषणा दिल्या.
अलीकडेच मोठ्या प्रमाणावर राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचे चित्र पाहायला मिळाले. नेपाळमध्ये युवा आंदोलकांनी बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि राजशाहीच्या पुनस्थापनेच्या मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन केले, तर फ्रान्समध्ये वादग्रस्त कायदे आणि आर्थिक धोरणांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि रस्त्यावर हिंसाचाराच्या घटना घडल्या. दोन्ही देशांमध्ये आंदोलनाची सुरुवात शांततेत झाली होती, पण नंतर ते हिंसक वळणावर गेले, ज्यामध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली, संपत्तीचे नुकसान झाले आणि अनेक लोक जखमी झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode