नवी दिल्ली, 14 सप्टेंबर (हिं.स.) लिव्हरपूल येथे खेळल्या गेलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप-२०२५ मध्ये भारताच्या जास्मिन लम्बोरियाने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जास्मिनने पोलंडच्या ज्युलिया झेरेमेटाचा ४-१ ने पराभव केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (२०२२) मध्ये कांस्यपदक विजेती असलेल्या जास्मिनने पहिल्या फेरीत पराभव पत्करल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि सामन्यात वर्चस्व गाजवले. ज्युलिया झेरेमेटा पॅरिस ऑलिंपिक २०२४ ची रौप्यपदक विजेती आहे.
जास्मिन पॅरिस ऑलिंपिक-२०२४ मध्ये एकही पदक जिंकू शकली नाही. त्यानंतर तिने खूप मेहनत घेत आपला खेळ उंचावला. कझाकस्तान येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्णपदक जिंकले होते.
लिव्हरपूल येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये जास्मिनने ब्राझीलच्या पॅन अमेरिकन चॅम्पियन ज्युसिलीन सेर्केरा रोम्यूचा ५-० असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिने उझबेकिस्तानच्या खुमोरानोबू मामाजोनोव्हाला ५-० ने हरवले. उपांत्य फेरीत तिने व्हेनेझुएलाच्या ओमिलेन कॅरोलिना अल्काला सेविकाला ५-० ने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरी जिंकल्यानंतर जास्मिन म्हणाली, 'ही भावना शब्दात वर्णन करता येणार नाही. मी विश्वविजेती असल्याचा मला खूप आनंद आहे. पॅरिस ऑलिंपिकमधील सुरुवातीच्या पराभवानंतर मी स्वतःला पूर्णपणे तयार केले. हे यश त्या कठोर परिश्रमाचे फळ आहे.'
त्याच जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या नुपूर शेओरनने ८० किलो गटाच्या अंतिम फेरीत पराभव पत्करला आणि रौप्य पदक जिंकले. तर पूजा राणीने कांस्यपदक पटकावले.
स्पर्धेत महिला बॉक्सर्सच्या मोठ्या यशाच्या उलट ही स्पर्धा पुरुष गटासाठी निराशाजनक ठरली. भारताचा १० सदस्यीय पुरुष संघ कोणत्याही पदकाशिवाय घरी परतत आहे. २०१३ नंतर पहिल्यांदाच भारतीय पुरुष बॉक्सर्स रिकाम्या हाताने परतले आहेत.
५० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत जदुमणी सिंग मँडेनबॉमने कझाकस्तानच्या विद्यमान विश्वविजेत्या संझार ताश्केनबेला कडवी झुंज दिली. पण त्याला ०-४ असा पराभव पत्करावा लागला. जदुमणी व्यतिरिक्त फक्त अभिनाश जामवाल (६५ किलो) उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. तर उर्वरित बॉक्सर्स सुरुवातीच्या फेरीतच बाहेर पडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे