बीड, 15 सप्टेंबर (हिं.स.)। बंजारा समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून बीडसह जालन्यात बंजारा समाजाचा महामोर्चाद्वारे एल्गार पाहायला मिळाला. बीड जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर महामोर्चा काढून राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने आयोजित या मोर्चात बंजारांनी सरकारला ठाम संदेश दिला आहे की, हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे.त्यामुळे त्यांना एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी बंजारा समाजाची भूमिका आहे.
बीडमधील मोठ्या ताकदीच्या मोर्चात खासदार बजरंग सोनवणे, धनंजय मुंडे, सुरेश धस, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि पंकजा मुंडे यांनी उघडपणे बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला. विशेषतः गेवराई विधानसभा मतदारसंघात ६३ हजार बंजार मतदार असून, माजलगाव आणि परळी मतदारसंघात तब्बल 70 हजार लोकसंख्या, त्यापैकी 50 हजार मतदार असल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे स्वतः मोर्चात सहभागी आहेत. बीड मतदारसंघात 30 हजार तर आष्टीत 20 हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे बंजारांचा प्रभाव स्थानिक राजकारणावर निर्णायक ठरत आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बंजारा समाजानेही त्याच तार्किक आधारे एसटी आरक्षण मिळवण्याचा अधिकार मागितला आहे. बंजारा समाज सध्या व्हीजेएनटी (ए) प्रवर्गात असून, हैदराबाद गॅझेटमध्ये आदिवासी समाज म्हणून त्यांचा उल्लेख असल्याने त्यांना एसटी आरक्षण द्यावं, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.
राजकीय नेत्यांनी मोर्चाला खुला पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन राज्यात एक नवा राजकीय टर्निंग पॉईंट ठरत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंजार समाजाचा पाठिंबा कोणत्याही पक्षासाठी निर्णायक ठरणार असल्याने, राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे.
बीडसह जालन्यातही बंजारा समाजाने एकजूट दाखवत महामोर्चा काढला असून, एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारांनी जबरदस्त एल्गार केला आहे. या मोर्चाने राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण केला आहे, त्यामुळे लवकरच हा प्रश्न न्यायालयीन किंवा शासकीय पातळीवर अंतिम निर्णयाकडे जाण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule