हाडे गोठवणाऱ्या थंडीत, ध्रुवीय भालूंच्या सावटात 8 तासांची शौर्यगाथा
कोलकाता, 15 सप्टेंबर (हिं.स.) : कोलकाता उत्तर ध्रुवासारख्या अत्यंत प्रतिकूल हवामानात 42 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करून कोलकात्याचे राम गोपाल कोठारी यांनी इतिहास रचला आहे. आर्क्टिक महासागराच्या गोठलेल्या बर्फावर पार पडलेल्या या 'नॉर्थ पोल मॅरेथॉन'मध्ये भाग घेणारे कोठारी हे पहिले भारतीय ठरले आहेत.
या अत्यंत कठीण स्पर्धेत अमेरिका, चीन, इंग्लंड, बेल्जियमसह एकूण 27 देशांतील 61 स्पर्धक सहभागी झाले होते. मायनस 8 अंश सेल्सियस तापमान, 75 किमी/ताशी वेगाने वाहणाऱ्या बर्फील्या वाऱ्यां, ध्रुवीय भालूंचा धोका आणि फाटणाऱ्या बर्फाच्या तुकड्यांखाली महासागरात बुडण्याचा संभव – या सगळ्यांवर मात करत राम गोपाल कोठारींनी 8 तासांत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
राम गोपाल यांनी 3 जुलै रोजी कोलकात्यातून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. दोहा आणि ओस्लोमार्गे ते 4 जुलै रोजी स्वालबर्ड (पृथ्वीवरील उत्तर टोकावरील शेवटचे वसतीयोग्य ठिकाण) येथे पोहोचले. तेथून अन्य स्पर्धकांसोबत 6 दिवसांच्या जहाज प्रवासानंतर 12 जुलै रोजी उत्तर ध्रुवावर पोहोचले.
13 जुलै रोजी सकाळी 8.45 वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला. प्रारंभी अति थंडी व धुक्यामुळे अडचणी आल्या, पण नंतर काही काळासाठी सूर्यप्रकाश मिळाला. मात्र बर्फ वितळू लागल्याने त्यांच्या पायांना अडथळे येत राहिले, तरीही त्यांनी हार मानली नाही. 20 सुरक्षारक्षक बंदुकींसह तैनात होते, कारण ध्रुवीय भालूंचा धोका कायम होता.
मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर कोठारींनी उत्तर ध्रुवावर भारतीय तिरंगा फडकावला, आणि हा क्षण त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय ठरला.
राम गोपाल कोठारी हे व्यवसायाने विमा व्यावसायिक असून त्यांनी कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता, कोलकात्याच्या रस्त्यांवर धावत ही तयारी केली. त्यांच्या कुटुंबाने सुरुवातीला या मोहिमेला विरोध केला होता, पण आता त्यांच्या यशामुळे ते सर्वजण अभिमान बाळगत आहेत.या अपूर्व कामगिरीनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांचा सन्मान केला आहे. कोठारींचे पुढील लक्ष्य आहे – 2026 मध्ये 'सेव्हन सेव्हन सेव्हन' वर्ल्ड मॅरेथॉन चॅम्पियनशिप, ज्यात सात खंडांमध्ये सात दिवसांत 42-42 किमीच्या मॅरेथॉन स्पर्धा पार कराव्या लागतात.
त्याचबरोबर 2027 पर्यंत 100 देशांची सफर पूर्ण करणे हेही त्यांचे स्वप्न आहे. आत्तापर्यंत त्यांनी 71 देशांना भेट दिली आहे, ज्यात अमेरिका, इंग्लंड, जपान, मलेशिया, आइसलँड, स्वित्झर्लंड, ग्रीनलँड इत्यादी देशांचा समावेश आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे या 'नॉर्थ पोल मॅरेथॉन'मध्ये भाग घेण्यासाठी सुमारे 45 लाख रुपये खर्च येतो. ही स्पर्धा 2023 मध्ये सुरु झाली असून, इतक्या खर्चातही कोठारींनी आपला निर्धार दृढ ठेवत हा पराक्रम गाठला आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis