मुंबई, 15 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई, पुणे,जळगाव,सोलापूर, बीड, रायगड आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांवर पावसाचा प्रचंड तडाखा जाणवला.रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर पहाटे वाढत गेला. मुसळधार सरींमुळे मुंबईतील हिंदमाता, दादर, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डनसह अनेक सखल भाग पाणी साचल्याचे दिसून आले.त्यामुळे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली.पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला असून आहे.
मुंबईतील लोकल वाहतूक पावसामुळे विस्कळीत झाली होती. माटुंगा स्थानक परिसरात पाणी साचल्याने मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या. हार्बर आणि पश्चिम मार्गावरही पाच ते दहा मिनिटांचा विलंब नोंदवला गेला होता.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा परिसरात देखील संततधार पावसाने त्रस्त केले. घाटमाथा आणि धरण परिसराला ऑरेंज अलर्ट असताना अंबड व घनसावंगी तालुक्यांतील सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदली गेली. खरीप पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कोकणात रत्नागिरीसह अनेक ठिकाणी कमी वेळात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली.
हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वाढल्याचे स्पष्ट केले. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानातून सुरू असतानाच राज्यात पुन्हा पावसाची तीव्रता वाढल्याचे चित्र दिसले. कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि याठिकाणी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.जळगाव जिल्ह्यातील सातगाव डोंगरीत ढगफुटीसदृश पावसामुळे दगडी नदीत पूर आला. अनेक उपकेंद्र, घरे, शेती आणि रुग्णालये पाण्याखाली गेली. ग्रामस्थांनी प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीने झालेले नुकसान अजून भरून न भरलेले असतानाच पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी व नागरिक चिंतेत आहेत. यलो अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाचे पावले अपेक्षित आहेत.
पुण्यातही अनेक भागात सरासरी साठ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. लोणी व वाक वस्ती परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद आहे. काही नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने अनेक ठिकाणी पडलेल्या झाडांच्या घटनांवर काम करून नागरिकांचे रक्षण केले आहे.बीड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टीने हालचाल बाधित झाली आहे. बीडमधील आष्टी तालुक्यातील कडा येथे ११ जणांना हेलिकॉप्टरने वाचवण्यात आले आहे. धाराशिवमध्ये पूरामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले असून संपर्क तुटला होता.नागरिकांना अनावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule