अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)
मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल बुधवारी, १७ सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यासह मेळघाटातील काही पदाधिकारी या वेळी माजी आमदार काँग्रेसवासी होतील.या पक्षप्रवेशाला त्यांचा मुलगा, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल यांनी दुजोरा दिला. त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ येणार आहेत.पटेल यांचा काँग्रेस प्रवेश काँग्रेस भवनात होईल, हा कार्यक्रम दुपारी २ वाजता सुरु होणार आहे. राजकुमार पटेल हे तीनवेळा आमदार राहिले आहेत. बहुजन समाज पक्षापासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष असा होत काँग्रेस जवळ थांबणार आहेत.२९१४ च्या निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. परंतु गत निवडणुकीत त्यांना भाजपच्या उमेदवाराने पराभूत केले.या त्यांच्या काँग्रेस प्रवेशासाठी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी प्रयत्न केले, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. या पक्ष प्रवेशावेळी वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहतील, या कार्यक्रमाच्या तयारीसाठी रविवारी काँग्रेस भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी खासदार बळवंतराव वानखडे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी