नवी दिल्ली, १५ सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. त्यावर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला यांच्या खंडपीठापुढे उद्या, मंगळवारी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. आता न्यायालय मुदतवाढ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली चार-पाच वर्षे लांबणीवर पडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अखेरीस निवडणुकांना दिलेली स्थगिती उठविली असून ऑक्टोबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आयोगाला मे महिन्यात दिले होते. त्यानुसार आयोगाने प्रभागांची पुनर्रचना, आरक्षणे, मतदारयाद्या अद्ययावत करणे, आदी प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे आयोगाला शक्य नाही. म्हणून त्या टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागणार आहेत. सप्टेंबर महिन्यात नवरात्र व ऑक्टोबरमध्ये दिवाळीचा उत्सव आहे. प्रभागांची रचना अंतिम होण्यासाठी सुनावणीची प्रक्रिया सुरू असून ती पुढील महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठीही काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी विनंती आयोगाने सर्वोच्च न्यायालयास केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी