कल्याणमध्ये ५० खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्याच्या बहाण्याने ७० लाखांची फसवणूक
कल्याण, 15 सप्टेंबर (हिं.स.)। कल्याण पश्चिमेतील आरटीओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये ५० खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्याचा आमिष दाखवून एका डॉक्टर दाम्पत्याने तब्बल ७० लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण
Kalyan hospital Fraud Case


कल्याण, 15 सप्टेंबर (हिं.स.)। कल्याण पश्चिमेतील आरटीओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये ५० खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्याचा आमिष दाखवून एका डॉक्टर दाम्पत्याने तब्बल ७० लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दाम्पत्याची नावे डॉ. प्रसाद साळी आणि वैशाली साळी अशी आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, डॉ. प्रसाद आणि वैशाली साळी यांनी मेडिकल स्टोअर सुरू करण्याचे आश्वासन देत मे २०२४ मध्ये डॉ. राहुल दुबे व फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांच्याकडून ७० लाख रुपये चेकद्वारे घेतले. त्यांनी तीन महिन्यांत हॉस्पिटल सुरू करण्याचे वचन दिले होते. मात्र एक वर्ष उलटूनही हॉस्पिटलचे कोणतेही काम सुरू झाले नाही आणि पैसे परतही केले गेले नाहीत.

डॉ. दुबे व प्रज्ञा कांबळे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून त्यांच्याकडे आरोपी दाम्पत्याने दिलेला लेखी करार व कागदोपत्री पुरावे आहेत. त्यांच्यानुसार, या फसवणुकीत आणखी डॉक्टर, फार्मासिस्ट आणि पॅथोलॉजिस्ट यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस पुढील तपास करत असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फसवणूक झालेल्या डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.अद्याप आरोपी पकडले गेलेले नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande