- नाशकात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशाल आक्रोश मोर्चा
नाशिक, 15 सप्टेंबर (हिं.स.) - काळ्या आईशी इमान राखणारे शेतकरी अस्वस्थ आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असतो. अतिवृष्टी झाली तर त्याचा परिणाम शेतकरी वर्गावर होता. त्यामुळे शेतकऱ्यावर संकट आल्यावर त्याला मदत करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण आजचे राज्यकर्ते जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. गेल्या दोन महिन्यात दोन हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी जीव देतो, परंतु राज्यकर्ते त्याच्या मागे उभे राहत नाही ही फार गंभीर गोष्ट आहे. जर शेतकऱ्यांच्या या मोर्चाची दखल घेतली नाही, तर नाशिकचा हाच मोर्चा भविष्यात आणखी उग्र रूप घेईल, असा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाकडून नाशकात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जमाफी त्वरीत जाहीर करावी, कांद्याची मुक्त निर्यात सुरु करावी, कापसाची आयात थांबवावी, शेतीमालाला हमी भाव द्यावा, यासह अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जळगाव जिल्ह्यातील कांदा आणि केळी उत्पादकही मोर्चात सहभागी झाले होते. यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांसह पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
पवार म्हणाले की, एकीकडे शेतकर्यांचा संसार अडचणीत आला असताना, दुसरीकडे देवाभाऊंनी सगळ्या महाराष्ट्रात पोस्टर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे दाखवले. बळीराजा उपाशी राहता कामा नये, ही शिवाजी महाराजांची शिकवण होती. तो आदर्श देवाभाऊ घेतील असे वाटले होते, पण त्यांनी तसे केले नाही. नेपाळमध्ये काय घडले त्याच्या खोलात मी जात नाही. मात्र देवाभाऊ यातून शहाणपणा घेतील, असे सूचक विधानही पवारांनी यावेळी केले.
मी देशाचा कृषीमंत्री असताना एकदा माझ्या वाचनात आले की, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली शेतकरी जीव देत आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यासाठी आपल्याला दिल्लीत बसून विषय सुटणार नाही. जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन समजून घेऊ, अशी विनंती मी त्यांना केली. त्यानंतर मनमोहन सिंग तयार झाले आणि नागपूर, अमरावती, यवतमाळला आम्ही गेलो. आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांचे बँका पतसंस्था व सावकारांकडे कर्ज थकले आहे, त्यामुळे शेतकरी जीवन संपवत आहे, अशा तक्रारी मिळाल्या आणि त्यावेळेस कर्जबाजारीपणा हा एक रोग असल्याचे लक्षात आले. तेव्हा तात्काळ आम्ही कर्जमाफी केली होती याची आठवण देऊन ते म्हणाले की शेतकऱ्यांचे दुःख समजत नाही हे दुर्दैव आहे. कांदा सोयाबीन व इतर पिकांना जर परवानगी दिली, तर त्यातून शेतकऱ्यांचे घर चालते. पण तिची जाणीव नसलेल्या सरकारला हाच नाशिकचा मोर्चा उग्र स्वरूप धारण करून शेतकरी वर्ग धडा शिकवेल, असा इशारा दिला.
सरकार कोणत्याही जातीधर्माचे नसावे. सरकार सर्वांचे आणि व्यापक असावे. सरकारने कोणत्याही एका जातीची समिती न करता ती समाजाची करावी. सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य राहिले आहे. सामाजिक ऐक्य जपले गेले पाहिजे. आता या ऐक्यालाच तडा बसत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV