अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
गल्ली ते दिल्लीपर्यंत मेळघाटातील मानव वन्य प्राणी संघर्षाच्या बातम्यांनी खळबळ उडाली असताना मेळघाटात अजूनही वाघाचा धुमाकूळ सुरुच आहे. सध्या खोंगडा व सेलू जोडवर वाघाचा संचार आणि दिवसाच दर्शन होत असल्याने घाटात दिवसा फिरणे पण आता धोक्याचे झाले आहे.
मेळघाटात गेल्या एका वर्षात सात जणांचा वाघाने फडशा पाडलेला आहे. सात जणांची शिकार करणारे वाघ हे वेगवेगळे असले तरी पाळीव प्राण्यांची शिकार करणाऱ्या बिबट आणि वाघांनी एकच हैदोस केलेला आहे. दुसरीकडे धारणी व चिखलदरा भागातील मका, धान व सोयाबीन पिकांचे नुकसान जंगली डुकरांनी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे चौबाजुनी शेतकऱ्यांचे जीवन आर्थिक कोंडीत सापडले आहे.खोंगडा जंगलातील राजदेव बाबा नाक्याच्या मधोमध रोडवर वडाचे झाड असलेल्या ठिकाणी १४ सप्टेंबर रोजी तीन युवकांना दुपारीच वाघाचे दर्शन झाल्याने परीसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आ. केवलराम काळे यांना याबाबत माहिती दिल्यावर वनविभागाचे कर्मचारी मोक्यावर पोहचले मात्र तोपर्यंत वाघ जंगलात निघून गेला होता.धारणीच्या धावडीचे राजा पाटील, हातिदागावचे कैलाशयेवलेव कोळगावचे संतोष भाकरे यांनी खुल्या डोळ्याने वाघ पाहल्याचे सांगितले. यापूर्वी हरीसाल व अकोट मार्गादरम्यानच्या झेलु फाट्या जवळ पण पट्टेदार वाघाला अनेकांनी पाहिल्याची माहिती ढाकणा भागातील लोकांनी दिलेली आहे. मेळघाटातील अढाव, सावऱ्या, गडगा भांडूम, गोलाई, हरिसाल, केकदाखेडा, बोथरासह अनेक गावातील जनावरांची शिकार वाघाने केलेली आहे. वाघाला जेरबंद करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असल्या तरी कमीतकमी पावसाळ्यात शक्य नसल्याचे जाणकार लोक सांगत आहे. या शिवाय शिकारीच्या एका स्पॉटपासून दुसरा स्पॉट खुप अंतरावर असल्याने शिकारी वाघाची संख्या जास्त आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्प कर्मचारी अडचणीत असून पेट्रोलिंग वप्रशिक्षण आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी