नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांची सप्टेंबर महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या वर्ल्ड पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप-२०२५ या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेली आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत स्वतःचे आगळे वेगळेस्थान निर्माण केले आहे.
सन २०१७ पासून त्यांची क्रीडा कारर्किर्द सुरू झाली. ९ वर्षांच्या काळात त्यांनी आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत त्या २३ सुवर्ण,३ रौप्य व ७ पदकांवर नाव कोरले.
एकूण ३३ पदकांची त्यांनी कमाई केली. आजपर्यंत त्यांनी ९ देशांमध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे.
सन २०२१ मध्ये टोकिओ व २०२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे सौभाग्य तिला लाभले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पॅरिसमध्ये झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा ध्वजवादक होण्याचा बहुमान भाग्यश्री जाधव यांना मिळाला आहे. राज्य सरकारने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच त्यांची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी- वर्ग एक या पदावर नियुक्ती दिली आहे.
भाग्यश्री जाधव यांची दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे दि.२५ सप्टेंबर ते दि. ५ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पिअनशीप-२०२५ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis