अकोला, 16 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील ५ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांना गोवर व रुबेला लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असून, ती ३० सप्टेंबरपर्यंत राबवली जाईल. एकही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत.
लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आरती कुलवाल, आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे, डॉ. विनोद करंजीकर आदी उपस्थित होते. गोवर-रूबेला लसीकरणाची मोहिम जिल्हाभर विविध टप्प्यांत राबविण्यात येते. या टप्प्यात जी मुले निवासी शाळांमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत, अशा मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानुसार ५ हजार २२३ विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाईल, अशी माहिती डॉ. करंजीकर यांनी दिली. लसीकरण मोहिमेअंतर्गत निर्धारित लक्ष्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोवर व रुबेला आजाराचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने पूर्णत: लसीकरण साध्य करणे आवश्यक आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे