लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।लातूर जिल्ह्यात कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिमेंतर्गत 3 हजार 955 शिबिरांमधून नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे
महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारे मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग यांच्या प्रारंभिक शोधासाठी लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोग जनजागृती व तपासणी मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम 4 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 3 हजार 955 शिबिरांमधून 30 वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यातील 51 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 252 उपकेंद्रे, 14 ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय आणि सामान्य रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यात मुख कर्करोगासाठी 2 लाख 82 हजार 382 लोकांची तपासणी झाली, त्यापैकी 68 संशयित रुग्णांपैकी 10 जणांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, 1 लाख 83 लाख 963 महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी झाली, त्यात 19 संशयितांपैकी 3 महिलांना कर्करोगाचे निदान झाले.
गर्भाशय मुख कर्करोगासाठी 1 लाख 62 हजार 855 महिलांची तपासणी झाली, त्यात 17 संशयितांपैकी 2 महिलांना कर्करोगाचे निदान झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही मोहीम जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis