पाथरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेनेची मागणी
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। पाथरी तालुक्यात जूलै महिन्यापासून सर्वदुर सतत पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने चारही महसूल मंडळातील खरीपाच्या पिकांचा चिखल झाला आहे. त्यामुळे शासनाने पाथरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने (उबाठा) केली
पाथरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : शिवसेनेची मागणी


परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। पाथरी तालुक्यात जूलै महिन्यापासून सर्वदुर सतत पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने चारही महसूल मंडळातील खरीपाच्या पिकांचा चिखल झाला आहे. त्यामुळे शासनाने पाथरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने (उबाठा) केली आहे.

जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने तहसीलदारांना आपल्या मागणी संदर्भातील एक तपशीलवार निवेदन सादर केले. त्याद्वारे, चालू खरीप हंगामात पाथरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, मुग, उडीद, कापूस आदी पिके पुर्णपणे पाण्याखाली गेल्यामूळे शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले आहे. तसेच पाथरी तालुक्यातील गोदावरीसह अनेक नदी, ओढया, नाल्यास पुर आल्यामुळे पाच जनावरे सुध्दा दगावली आहेत, आहेत त्या जनावरांसाठी चार्‍याची टंचाई निर्माण झाली असून शेतकर्‍यांना कर्जफेडीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असे या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले.

शासकीय निकषांच्या पुढे जाऊन शेतकर्‍यांना मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक नुकसान लक्षात घेता पाथरी तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करुन शेतकर्‍यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन शासकीय मदत, नुकसान भरपाई, कर्जमाफी व ओला दुष्काळ अनुदान तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर जिल्हाप्रमुख धर्मे, तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, युवासेना उपजिल्हा प्रमुख रामचंद्र आम्ले, युवासेना तालुका प्रमुख राजेभाऊ शिंदे, शहर प्रमुख दिपक कटारे, उप तालुका प्रमुख रावसाहेब निकम, विजय नखाते, कुंडलिकराव हारकाळ, माऊली गलबे, बालासाहेब कोल्हे, तुकाराम हारकाळ, परमेश्‍वर इंगळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande