स्व. यशवंत भिमराव आंबेडकर यांचे टपाल तिकीट प्रसिद्ध करण्याची मागणी
अकोला, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। “चैत्यभूमी स्मारकाचे निर्माते व समतेच्या लढ्याचे शिल्पकार स्व. यशवंत भिमराव आंबेडकर (भैय्यासाहेब) यांच्या कार्याला व त्यागाला खरी आदरांजली म्हणून त्यांच्या स्मृतीदिना निमित्त म्हणजेच १७ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्र शासनाने
प


अकोला, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। “चैत्यभूमी स्मारकाचे निर्माते व समतेच्या लढ्याचे शिल्पकार स्व. यशवंत भिमराव आंबेडकर (भैय्यासाहेब) यांच्या कार्याला व त्यागाला खरी आदरांजली म्हणून त्यांच्या स्मृतीदिना निमित्त म्हणजेच १७ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्र शासनाने टपाल तिकीट प्रसिद्ध करावे, ही केवळ मागणी नसून महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाला उजाळा देणारी गोष्ट आहे,” असे मत वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांनी व्यक्त केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्य शासनाने तातडीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा निर्णय ऐतिहासिक करावा, अशी मागणी केली आहे.

दशकभर सातत्याने पाठपुरावा ―

स्व. भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित व्हावे, यासाठी निलेश देव यांनी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे.

२ जानेवारी २०१६ : पहिला प्रस्ताव शासनाकडे सादर.

२१ जुलै २०२३ : सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाला दिला.

११ सप्टेंबर २०२३ : राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलून केंद्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे अधिकृत प्रस्ताव सादर केला.

९ ऑक्टोबर २०२३ : मुख्यमंत्री फडणवीस यांनाही विशेष स्मरणपत्र देण्यात आले.

तथापि, आजतागायत केंद्र शासनाकडून अंतिम मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करून हा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा, अशी अपेक्षा देव यांनी व्यक्त केली.

चैत्यभूमी स्मारक उभारणीमागील शिल्पकार ―

६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पार्थिव दादर समुद्रकिनारी अंत्यसंस्कारासाठी आणले गेले. यानंतर भैय्यासाहेब आंबेडकर यांनी “महू ते चैत्यभूमी” अशी ऐतिहासिक यात्रा काढून लोकनिधी उभारला आणि चैत्यभूमी स्मारक उभारले. आज हे स्थळ फक्त स्मारक नाही, तर जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे ऊर्जास्थान आहे. दरवर्षी ६ डिसेंबरला लाखो अनुयायी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजेरी लावतात.

भैय्यासाहेबांचे योगदान ―

भैय्यासाहेब आंबेडकर हे केवळ बाबासाहेबांचे सुपुत्र नव्हते, तर स्वतंत्र विचारवंत, बौद्धधर्म प्रचारक, प्रभावी पत्रकार, आंबेडकरी चळवळीतील नेते,विधान परिषदेवर आमदार आणि वंचित घटकांचे लढवय्ये होते.

त्यांनी आयुष्यभर बौद्ध समाज व वंचित घटकांसाठी संघर्ष केला. पत्रकारितेद्वारे समतेचे विचार घरोघरी पोहोचवले.

“हे तिकीट दीपस्तंभ ठरेल” ―

“हे टपाल तिकीट हे फक्त स्मरणिका नसून समतेच्या विचारांचा दीपस्तंभ ठरेल. चैत्यभूमीप्रमाणेच हे तिकीटही आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यासाठी लागणारे सर्व शासकीय शुल्क मी स्वतः उचलण्यास तयार आहे,” असेही निलेश देव म्हणाले.

आंदोलनाची चेतावणी ―

“जर या प्रस्तावाकडे शासनाने दुर्लक्ष केले, तर समाजाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्रासाठी गौरव ―

“हा निर्णय झाला, तर तो केवळ आंबेडकरी समाजासाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीला नवी ऊर्जा देणारा ठरेल,” असे देव यांनी पत्राच्या शेवटी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande