गडचिरोली., 16 सप्टेंबर (हिं.स.) : शासनाने दिलेल्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी व नियोजनाबाबतची आढावा बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (१६ सप्टेंबर) रोजी पार पडली. बैठकीला तहसीलदार बालाजी सोमवंशी, नायब तहसीलदार एन. सी. दाते, नायब तहसीलदार गुणवंत वाबिटकर, नायब तहसीलदार प्रतीक आढव उपस्थित होते.
सेवा पंधरवड्याला १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या दिवशी सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली येऊन नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देतील. १७ ते २२ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात पाणंद / शिवार रस्त्यांना क्रमांक देणे त्यांचे सर्वेक्षण करणे, गाव नकाशावर चिन्हांकित करणे, आणि त्यांची नोंद करणे यासारख्या कामावर भर दिला जात आहे.
२३ ते २७ सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत घर बांधण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींचे पट्टे वाटप करणे तसेच शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे व योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप केले जाणार आहेत. २८ ते २ सप्टेंबर या तिसऱ्या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत जसे लक्ष्मी मुक्ती योजना, आपसी वाटणीची प्रकरणे आणि शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन सर्टिफिकेट वाटप करण्यात येणार आहेत.
यासोबतच सेवा पंधरवड्यात बचत गटांना कर्जवाटप, महा डीबीटी योजनेचे अर्ज स्विकारणे, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, माझी कन्या भाग्यश्री योजना, नवीन मतदार नोंदणी, ई-रेशन कार्ड, महसूल व अतिक्रमण विषयक कामकाज, सामाजिक अर्थसाहाय्य योजना, शेती सुलभ योजना, शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबासाठी मदत करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी शिबिर घेणे आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्याचा लाभ सर्वांनी लाभघ्यावा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय आसवले यांनी केले आहे.
अहेरी तालुक्यात मोठ्या उत्साहात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. अहेरी तालुक्यात 184 गावांचा समावेश असून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर 17 आणि 18 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना या पंधरवडा विषयी माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पंधरवड्याच्या नियोजन झाला असून नागरिकांनी देखील पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond