नाशिक, 16 सप्टेंबर (हिं.स.)।मागील काही महिन्यात बिबट्याचा हल्ला, बिबट्याचे दर्शन, जीवितहानीच्या अनेक घटना सातत्याने नाशिक आणि आसपासच्या परिसरात घडत आहेत. मागच्या महिन्याभरात चिमुकल्यांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावल्याची घटना घडली आहे. मानवी जिवासोबतच बिबट्याच्या देखील जीविताला यामुळे निर्माण झालाय. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रश्नाचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने त्यांनी पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी उपवनसंरक्षक सिद्देश सावर्डेकर यांच्यासोबत बैठक घेत प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी अल्पकालीन आणि दीर्घकालीन काय उपाययोजना करणे शक्य आहे याबाबत चर्चा झाली.
नाशिक तालुक्यात वडनेर पाठोपाठ सिन्नर तालुक्यातील खंडांगळी याठिकाणी देखील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मागील आठवड्याभरात ४ ते ५ ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या तर असंख्य ठिकाणी दर्शन दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील काही वर्षात बिबट्याचा वाढलेला अधिवास आणि मानवी वस्तीमधील संचार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही समस्या अत्यंत गंभीर होत चालली असून यातून मानवी आणि बिबट्याच्या देखील जीविताला प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड आणि काही प्रमाणात दिंडोरी आणि त्रंबकेश्वर तालुक्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव तालुक्यातील असंख्य गावात अक्षरशः दहशतीचे वातावरण आहे. अंधार पडल्यानंतर बंदीस्त करून घ्यायची वेळ नागरिकांवर येत आहेत. त्यातच लोडशेडिंगमुळे रात्रीच्यावेळी शेतीला पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. याआधी रात्रीच्यावेळी बिबट्या हल्ला करत होता मात्र मागील काही घटनांमधून दिवसादेखील बिबट्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यात लहान चिमुकले बिबट्यासाठी सोप्पे शिकार ठरत आहेत. यामुळे दहशतसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
बिबट्याच्या मुक्त संचारामुळे आणि वाढत्या अधिवासामुळे निर्माण होत असलेल्या या गंभीर समस्येबाबत खासदार राजाभाऊ वाजे मैदानात उतरले असल्याचे बघायला मिळत आहे. याबाबत काय उपयोजना करता येतील याबाबत खासदार वाजे यांनी पाऊले टाकायला सुरवात केलीये. याबाबत त्यांनी स्थानिक परिस्थिती जाणून घेत त्याबाबत उपवनसंरक्षक सिद्देश सावर्डेकर यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केली. यावेळी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या बाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच, सोबत मिळून या समस्येवर तोडगा काढण्याबाबत एकमत झाले.
बिबट्या ही समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. यावर ठोस उपाययोजना करावी लागणार आहे. गावागावात दहशतीचे वातावरण आहे. या भीतीचे रूपांतर उद्रेकात व्हायला वेळ लागणार नाही. बिबट्याचा वाढलेला अधिवास आणि मानवी वस्तीमधील मोकळा संचार यामुळे मानवी आणि बिबट्याच्या देखील जीविताला धोका निर्माण झालाय. त्यामुळे यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी पाऊल टाकली जाणार आहे. याबाबत दिल्लीपर्यंत लढाई करावी लागणार आहे, त्यादृष्टीने पाऊल टाकायला आम्ही सुरवात केलीये. :
राजाभाऊ वाजे, खासदार नाशिक
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV