परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। एन. व्ही. एस. मराठवाडा हायस्कूल, शिवाजीनगर येथे अन्न व औषध प्रशासन विभाग परभणी यांच्या वतीने अन्नसुरक्षा जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात अन्नातील भेसळ कशी ओळखावी याबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. अन्नपदार्थांमध्ये दिवसेंदिवस वाढणारी भेसळ, विशेषत: सण-समारंभांच्या काळात होणारी खाद्यपदार्थांमधील भेसळ, यावर भर देत श्री. विजय नायबळ यांनी विद्यार्थ्यांना घरगुती स्तरावरील छोट्या चाचण्यांद्वारे भेसळ ओळखण्याच्या पद्धती दाखवून दिल्या. यात दूध, चहा पावडर, हळद इत्यादीतील भेसळ ओळखण्याची प्रत्यक्ष उदाहरणे सादर करण्यात आली.
या प्रसंगी सहाय्यक आयुक्त श्री. अनंत चौधरी, अन्नसुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे, वैभव ठोंबरे, कृष्णा मोरे तसेच तंत्र अधिकारी प्रयोगशाळा संभाजीनगरचे वैभव नायबळ उपस्थित होते. शाळेचे पर्यवेक्षक श्री. शिवाजी आरळकर, श्री. सूर्यकांत पाटील, श्री. सुनील रामपूरकर यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी संस्थेचे सल्लागार श्रीपाद कुलकर्णी, शिवप्रसाद कोरे, अभिजित विनोद लोलगे, सुधाकर रेडगे, अविनाश कंधारकर आदींनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis