लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। गोवर-रुबेला आजाराच्या निर्मूलनासाठी लातूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष लसीकरण मोहीम राबविली जात आहे. राज्यात गोवरच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सर्व आश्रमशाळा आणि मदरसांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना गोवर-रुबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात येणार आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत गोवर-रुबेला निर्मूलन आणि ९५ टक्क्यांहून अधिक लसीकरणाचे प्रमाण साध्य करणे, हा या मोहिमेचे उद्देश आहे.
जिल्ह्यातील ७४ आश्रमशाळांमधील १६ हजार १९७ मुलांना लसीकरणाचे लक्ष्य आहे. यासाठी १०८ आरोग्य पथके तैनात असून, २८ हजार ८०० लस डोसेस उपलब्ध आहेत. मोहिमेच्या यशस्वितेसाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक झाली. यात शिक्षण, समाजकल्याण, आरोग्य आणि महिला व बाल कल्याण विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मोहिमेची तयारी म्हणून १० सप्टेंबर २०२५ रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, तर ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. आश्रमशाळा आणि मदरसांमधील शिक्षक, पालकांना समुपदेशनाद्वारे माहिती देण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व पालकांना आपल्या मुलांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis