इस्लामाबाद , 16 सप्टेंबर (हिं.स.)।भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला मोठा धक्का दिला होता. या ऑपरेशनला अनेक महिने होऊन गेले असले तरीही अजूनही त्यासंदर्भात मोठे खुलासे समोर येत आहेत.
जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर इलियास काश्मीरी याने दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, ७ मे रोजी जेव्हा भारताने बहावलपूरवर हल्ला केला, तेव्हा मसूद अजहरच्या कुटुंबाचे तुकडे झाले.
इलियास काश्मीरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो सांगतो की, “मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबाला ऑपरेशन सिंदूर दरम्यान खूप मोठं नुकसान झालं आहे.” “सगळं काही संपल्यानंतर ७ मे रोजी बहावलपूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील लोक त्याच्या पत्नी, मुलं आणि लहानग्यांचं शव तुकड्यांमध्ये सापडलं. ते अक्षरशः तुकडे-तुकडे झाले होते.”
बहावलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्थित आहे. येथेच ‘मरकज सुभान अल्लाह’ नावाची एक मशीद आहे, जी जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय मानली जाते.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरदरम्यान अनेक दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं होतं, ज्यामध्ये जैशचं हे मुख्यालयही समाविष्ट होतं. या हल्ल्यात भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना जबरदस्त नुकसान केलं होतं. जैशचा संपूर्ण अड्डा उद्ध्वस्त झाला. याच मुख्यालयात मसूद अजहरचा परिवारही राहत होता.
भारतीय सैन्याच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी एका प्रेस ब्रीफिंगमध्ये याची पुष्टी केली होती की, “जैशच्या मुख्यालयातून भारताविरुद्ध हल्ल्यांची योजना बनवली जात होती.” पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं होतं. या ऑपरेशनदरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये असलेली नऊ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. भारताच्या या हल्ल्यात शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. सैन्याने बहावलपूरसोबतच मुरीदके, सियालकोट, कोटली आणि मुजफ्फराबाद येथील ठिकाणांनाही लक्ष्य बनवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode